
रशियातील एका आर्ट गॅलरीत काम करणाऱ्या 60 वर्षीय सुरक्षा रक्षकाने केलेल्या कारनाम्याची सध्या जगभर जोरदार चर्चा आहे. कंटाळा आला म्हणून या सुरक्षा रक्षकाने आपल्याजवळील पेनाने एका पेंटिंगवर डोळे काढले आहेत. त्याच्या या कारनाम्यामुळे तब्बल साडेसात कोटी रुपयांच्या दुर्मिळ पेंटिंगची वाट लागली आहे. या प्रकारामुळे पहिल्याच दिवशी या सुरक्षा रक्षकाला आपली नोकरी गमवावी लागली आहे. एवढेच नव्हे तर त्याच्या या कृत्याबद्दल त्याला तुरुंगवासदेखील भोगावा लागू शकतो. ‘थ्री फिंगर्स’ असे या पेंटिंगचे नाव असून पश्चिम-मध्य रशियाच्या येल्टसीन केंद्रात ते प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. ऍना लेपोरस्काया यांनी ते 1932-34 दरम्यान चितारले आहे. चित्रात तीन मानवाकृती दाखवण्यात आल्या असून त्यातील दोघांच्या चेहऱयावर या सुरक्षा रक्षकाने डोळे काढले आहेत. अल्फा विमा कंपनीकडे या पेंटिंगचा 7.50 कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला होता. पेंटिंगला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता तज्ञांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही पेंटिंग दुरुस्त करण्यासाठी साधारण अडीच लाख रुपयांचा खर्च येणार आहे.






























































