
आयना का बायना कोरोना काय जायना…अनलॉक नंतर कोरोना गेला असं समजून बेजाबदारपणे वागणाऱ्या रत्नागिरीकरांच्या डोक्यावर कोरोनाचे संकट पुन्हा घोंगावतेय.सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवत विनामास्क फिरत राहिल्यास एेन शिमग्यात कोरोनाच्या नावाने बोंब मारत रत्नागिरीकरांना घरात होम क्वॉरंटाईन होण्याची चिन्हे दिसत आहेत.गेल्या सहा दिवसात जिल्ह्यात तब्बल 126 कोरोनाबाधित रूग्ण सापडले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन जनजीवन पूर्वपदावर येत आहे असे वाटत असताना कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले.डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यात दिवसा दोन-चार रूग्ण सापडत होते.कोरोना रूग्णात लक्षणीय घट दिसून येत होती.कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण थांबले होते.जनजीवन पूर्वपदावर येताच कोरोना नियमांचे पालन न करत नागरिकांनी बेजबाबदारपणा दाखवायला सुरूवात करताच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला.सोमवारी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात तब्बल 30 रूग्ण सापडले.त्यामध्ये खेड तालुक्यातील एका गावातील 27 रूग्ण होते.दुसऱ्या दिवशी मंगळवारी 8 रूग्ण सापडले. 17 आणि 18 रोजी प्रत्येकी 23 रूग्ण सापडले. 19 रोजी 19 रूग्ण आणि आज शनिवारी 23 रूग्ण सापडले.गेल्या सहा दिवसात जिल्ह्यात 106 रूग्ण सापडले हि चिंतेची गोष्ट आहे.वाढत्या रूग्णसंख्येनंतर काही नागरिक सतर्क झाले आहेत.रत्नागिरी तालुक्यातील पाली गावात 27 फेब्रुवारी पर्यंत शाळा,अंगणवाडी,महाविद्यालय आणि आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 9829 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत त्यापैकी 9208 बरे झाले आहेत.आतापर्यंत 360 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



























































