
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2021-22 या आर्थिक वर्षात 20 कोटी 71 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेने सर्वच आघाड्यांवर चांगले काम केले आहे, मात्र कर्जाच्या आकडेवारीत घसरण झाली आहे. 178 कोटी रुपयांची कर्जे कमी वितरीत झाल्याची खंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पुढील वर्षी कर्ज रकमेची ही उणीव आम्ही भरून काढू, असा विश्वासही चोरगे यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी 2021-22 या आर्थिक वर्षातील बँकेचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत मांडला. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 53 कोटी 59 लाख रुपयांचे भाग भांडवल आहे. यंदाच्या वर्षी भाग भांडवलात 1 कोटी रुपयांची भर पडली. बँकेचा स्वनिधी 264 कोटी 16 लाख रुपये आहे. बँकेकडे 2288 कोटी 14 लाख रुपयांच्या ठेवी जमा आहेत. बँकेने 1379 कोटी 35 लाख रुपयांची कर्जे वितरीत केली आहेत. बँकेला 20 कोटी 71 लाख रुपयांचा नफा झाला आहे.
बँकेचा एनपीए शून्य टक्के असल्याची माहिती डॉ. चोरगे यांनी दिली. कोविडच्या काळात बँकेने विविध घटकांना सहकार्य केले अशी माहितीही चोरगे यांनी सांगितली. पुढे डॉ. चोरगे म्हणाले की, यंदाच्या वर्षी कर्जाची रक्कम कमी झाली. 178 कोटी रुपयांचे कर्ज कमी झाले. त्याचे कारण साखर कारखान्यांची कर्जे आम्ही कमी केली. यंदाच्या वर्षी कर्जाची रक्कम कमी झाली असली तरी पुढील वर्षी ती कमी आम्ही भरून काढू असे डॉ. चोरगे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष बाबाजी जाधव, मुख्य कार्यकारी संचालक सुनील गुरव आणि बँकेचे इतर संचालक उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक सुनील गुरव हे सेवानिवृत्त झाले. त्यांना बँकेच्या वतीने आज निरोप देण्यात आला. निरोप समारंभात मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.




























































