रत्नागिरीत दुर्गा केमिकल्स कंपनीला आग, लाखोंची हानी

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. श्री दुर्गा फाईन्स केमिकल्स असे या कंपनीचे नाव असून आग लागल्यावर झालेल्या स्फोटांसारख्या आवाजांमुळे लोटे औद्योगिक परिसर हादरून गेला. आग लागताच प्लॅन्टमध्ये काम करत असलेले सर्व कामगार प्रसंगावधान राखून बाहेर पडल्याने मोठ्या अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 2.45 वाजता कंपनीमध्ये आग लागल्याचे निदर्शनास येताच प्लॅन्टमध्ये काम करत असलेले कर्मचारी तात्काळ कंपनी गेटच्या बाहेर पडले. त्यानंतर कंपनीमध्ये रिअॅक्टरचे स्फोट होऊ लागले. कानठळ्या बसविणाऱ्या या आवाजांमुळे औद्योगिक वसाहतीचा सारा परिसर हादरून गेला. शिवाय अन्य कंपनीचे कामगार आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

दुर्गा केमिकल्स या कंपनीत आग लागल्याची माहिती मिळताच लोटे औद्योगिक वसाहतीचे दोन फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान खेड आणि चिपळूण नगरपालिकचे फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले.

फायर इंजिनसाठी लागणारे पाणी स्थानिक राजुशेठ पटवर्धन, तसेच आंब्रे यांच्या टॅकर्सद्वारे पुरविण्यात आले. फायर ब्रिगेडचे कर्मचारी गेले तीन तास आगीशी झुंज देत आहेत मात्र कंपनीत टोलवीन हे ज्वालाग्रही सॉलवन्टचा साठा असल्याने ही आग आटोक्यात येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या