
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
आय एम ए आणि वीरश्री ट्रस्टने आज रविवारी आयोजित केलेल्या मॅरेथॉन आणि मिनी मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.सहा वर्षापासून 50 वर्षापर्यंत वयाचे शेकडो नागरिकांनी यात सहभाग घेतला होता.सार्थ पांगारकर, रिया पाडळकर,राज शिवलकर,कशीष शेट्ये, अमन मंत्रा, स्वरांजली कार्लेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
थिबा पॅलेस येथील आकाशवाणी केंद्राजवळ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या मॅरेथॉन आणि मिनी मॅरेथॉन ला झेंडा दाखवून शुभारंभ केला. त्यानंतर प्रथम ड्रीम मॅरेथॉन ला सुरुवात झाली. या मॅरेथॉनची मारुतीमंदिर मार्गे टी आर पी आणि परत मारुती मंदिर येथे या मरेथॉनची सांगता झाली. तर 6 ते 15 वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या मिनी मॅरेथॉन ची सांगता मारुती मंदिर येथे झाली.
मिनी मॅरेथॉन मध्ये तीन गट करण्यात आले होते. त्या प्रत्येक गटातील मुलगे आणि मुलींचे प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. त्या मध्ये पहिल्या तीन क्रमांक 6 ते 9 वयोगटामध्ये मुलांमध्ये अमन मंत्रा, सार्थक कार्लेकर आणि अरमान मंत्रा तर मुलींमध्ये स्वरांजली कार्लेकर, सिमरीला जैन आणि शमिका खानविलकर यांचा क्रमांक आला.
तर 10 ते 13 वयोगटात मुलांमध्ये सार्थ पांगारकर, पियुष गिम्हवणेकर आणि रोहित रेड्डी तर मुलींमध्ये रिया पाडळकर, त्रिशा मयेकर आणि गायत्री शिवलकर यांचे अनुक्रमे पाहिले तीन क्रमांक आले. 14 ते 16 वयोगटात मुलांच्या गटात राज शिवलकर, आदिश नानवडे आणि आदित्य केळकर तर मुलींमध्ये कशीष शेट्ये, अनुजा माळी आणि इशिता गांधी यांनी अनुक्रमे पाहिले तीन क्रमांक पटकावले.
यावेळी वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष बालरोग तज्ञ डॉ निलेश शिंदे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ पराग पाथरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री बामणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये, डॉ तोरल शिंदे, डॉ शेरखाने, डॉ सोनाली पाथरे, डॉ. नाफडे, डॉ निशिगंधा पोंक्षे या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.































































