
दिवसेंदिवस वाढणारे कोरोना रुग्ण आणि ऑक्सीजनची निर्माण होणारी गरज लक्षात घेऊन जिह्यात पाच ठिकाणी ऑक्सिजन प्लॉण्ट उभारले जाणारे आहेत. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लॉण्ट पुढील सात दिवसात सुरू होतील. जिह्याला सध्या ऑक्सिजनचा ट्रँकर प्राप्त झाला असून 28 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. हा ऑक्सिजन तीन दिवस पुरेल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज झूमवरून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी कोविड आटोक्यात आणण्यासाठी व उपचाराबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, जिह्यात 5 ठिकाणी ऑक्सिजन प्लॉण्ट उभारणार आहोत. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाचा प्लॉण्ट लवकरच सुरू होईल. महिला रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॉण्टसाठी 90 लाख रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कामथे, कळंबणी आणि राजापूर या ठिकाणी ऑक्सिजनचे प्लॉण्ट उभारले जातील.
आमदार साळवींच्या निधीतून ओणी येथे हॉस्पिटल
माझ्या आमदार निधीमधून रत्नागिरी मतदारसंघातील 10 प्राथमिक आरोग्यकेंद्रे आणि 2 ग्रामीण रुग्णालयांत ज्या अपुऱया सुविधा आहेत त्या देण्यासाठी खर्च केला जाणार आहे. तर आमदार राजन साळवी यांच्या निधीतून ओणी येथे कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे असे सामंत यांनी जाहीर केले.
- महिला रुग्णालयात 30 आणि जिल्हा रुग्णालयात 30 असे एकूण 60 बेड वाढवण्यात येणार असून 10 नवे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात येणार आहेत.
- जिह्याच्या सीमांवर चेकपोस्टची संख्या वाढवण्यात येणार असून त्याठिकाणी ऑण्टिजेन टेस्ट केली जाणार आहे.
- जिह्यात एकूण 2055 बेड उपलब्ध असून गरज पडल्यास मुंबईच्या धर्तीवर कोविड सेंटर उभारले जाईल.
- जिह्याला लसीचाही पुरवठा झाला असून आज 5 हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. योग्य पद्धतीने लसीची मागणी केल्यास लसींचा पुरवठा होत राहील.
























































