रत्नागिरीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणणार, तपास सुरूच ठेवण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपुर्वी रत्नागिरी शहरामध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते. परजिल्ह्यातून आलेल्या दोघांनी जिल्ह्यात ठाण मांडून सेक्स रॅकेट सुरु केले होते. या सेक्स रॅकेटचे जाळे विणायला शहरात त्यांना कोणी मदत केली हे मात्र गेले काही दिवस गुलदस्त्यात राहीले आहे.

पहिल्या दोन आरोपींनंतर हे प्रकरण थंडावले असे वाटल्याने अनेकजण खुशीत गाजरे खात आहेत. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या प्रकरणाकडे पुन्हा गांभीर्याने लक्ष दिले आहे. या प्रकरणाचा तपास अद्यापही थांबलेला नाही असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या भूमीत सेक्स रॅकेटचे कन्स्ट्रक्शन मजबूत करणारे आणि सोबत एजंटगिरी करणारे अनेकजण लवकरच उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

25 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा रत्नागिरीच्या पथकाने ओसवालनगर येथील एका बंगल्यावर धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. एक बनावट गिर्‍हाईक पाठवून पोलीसांनी ही कारवाई केली होती. या कारवाईत पद्मीनबाई बादरवाड आणि शिवाजी पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

यातील पद्मीनबाई बादरवाड ही सोलापूरची असून शिवाजी पाटील हा कराडचा आहे़. परजिल्ह्यातून येऊन या दोघांनी दोन तीन महिने जिल्ह्यात ठाण मांडले होते. शहरात वेश्या व्यवसायही जोरात सुरु झाला होता. पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी सीडीआरही ताब्यात घेतला. त्यानंतर मात्र कोणीकोणी शहर पोलीस ठाण्याच्या शिडया चढल्या याबाबत माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली.

सेक्स रॅकेटची पाळेमुळे खणून काढा अशी नागरिकांनी आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. त्याने सेक्स रॅकेट उद्ध्वस्त होईल अशी अपेक्षा रत्नागिरीकरांना आहे. दोन आरोपींनंतर मात्र शहरामध्ये सेक्स रॅकेट सुरु करण्यास ज्यांनी मदत केली किंवा जे एजंटगिरी करत होते त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

यासंदर्भात दैनिक सामनाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची भेट घेऊन सेक्स रॅकेट प्रकरणाच्या बाबत बातचित केली असता त्यांनी या प्रकरणाचा तपास अद्याप संपलेला नाही. आम्ही शोध घेत आहोत. या प्रकरणात या लोकांना कोणी मदत केली, तसेच एजंट कोण आहेत हे पुढे येणे आवश्यक असल्याचे मत पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केले.