श्रृंगारतळी परिसरातील 3 किमी क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीत कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कोरोनाबाधित रुग्ण हा गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील असल्यामुळे श्रृंगारतळीपासून 3 किमी क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या 3 किमी परिसरात राहणार्‍या नागरीकांना घरातून बाहेर पडण्यास, अन्य ठिकाणी स्थलांतरीत होण्यास व बाहेरुन येणार्‍या लोकांना या क्षेत्रात येण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आहे.

दुबईहून श्रृंगारतळी येथे आलेला 50 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुबईतून आल्यानंतर त्याने सर्वप्रथम खासगी दवाखान्यात जाऊन तपासणी केली. खासगी डॉक्टरने त्याला शासकीय रुग्णालयात पाठवले. शासकीय रुग्णालयाने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यांच्या तपासणीचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी ती व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले़ कोरोनाबाधित व्यक्तीला वेगळ्या कक्षात ठेवून उपचार सुरु आहेत. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले त्याचे कुटूंबीय, चालक आणि अन्य व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत दुबईला आणखी कोणी गेले होते का याची माहिती घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़

23 मार्चपासून एसटी बस आणि खासगी गाड्या बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व अन्य ठिकाणाहून येणार्‍या जाणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस आणि खासगी ट्रॅव्हलर्स 23 मार्चपासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत़

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1 हजार रुपये दंड

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 117 अन्वये 1 हजार रुपये एवढा दंड आकारण्यात येणार आहे़

आजपासून जिल्ह्यात दारुबंदी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व दारुविक्री दुकाने, बार आज दि़ 19 मार्चपासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत़ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या 362 दारुदुकाने आहेत़ ती उद्यापासून बंद करण्यात येणार आहेत़ त्याचबरोबर पानपट्‌टी, कॉफीहाऊस, ज्युससेंटर, सर्व हॉटेल्स कम्युनिटी सेंटर, योगा व नृत्य क्लासेस, लग्न व अन्य समारंभाची सभागृहे दि़ 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत़ अत्यावश्यक वस्तू विक्रेते उदाहरणार्थ किराणा, दूध, फळे, औषधालये सुरु राहणार आहेत असे आदेश आज देण्यात आले आहेत़

कोकण रेल्वे मार्गावरील डबल डेकर आणि दुरान्तो एक्स्प्रेस रद्‌द
कोकण रेल्वेमार्गावरील चार गाड्या रदद करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये 11085/11086 लोकमान्य टिळक ते मडगाव डबल डेकर ही गाडी 23, 24, 26, 27 आणि 30 मार्चला रद्‌द करण्यात आली आहे़ गाडी क्र. 12223 / 12224 लोकमान्य टिळक – एर्नाकुलम दुरान्तो एक्स्प्रेस ही गाडी 21, 22, 24, 25, 29, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी बंद राहणार आहे़

…तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करु

जे लोक दुबई किंवा कोरोनाबाधित देशातून रत्नागिरीमध्ये आले आहेत अशा व्यक्तींची माहिती आम्ही पोलीस ठाण्यातून गोळा करत आहोत. गुहागरातून अशी 25 जणांची यादी तयार झाली आहे. जे लोक दुबई किंवा कोरोनाबाधित देशातून रत्नागिरीमध्ये आले आहेत त्यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा पोलीसांशी संपर्क साधावा. त्यानंतरही असे लोक आम्हाला आढळले तर त्या व्यक्तीसह त्याच्या कुटूंबीयांवरही आम्ही गुन्हे दाखल करु असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ़. प्रवीण मुंढे यांनी दिला आहे.