कॉफिन…शवपेटीच्या भोवतीची भावनिक गुंफण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गेश आखाडे। रत्नागिरी

‘कॉफिन’ अर्थात शवपेटी…शवपेटीभोवती फिरणाऱ्या भावनिक गुंफण असलेल्या नाटकाचे शिवोली सेवामंडळाच्या उमद्या कलाकारांनी सांघिक ताकदीच्या जोरावर राज्य नाट्य स्पर्धेत जबरदस्त सादरीकरण केले.अभिनयाबरोबर नाटकाची तांत्रिक बाजूही बेफाम होती.
चैतन्य सरदेशपांडे सारख्या नव्या दमाच्या नाट्यलेखकाची कॉफिन हि संहिता म्हणजे नाट्यलेखनातील नवनिर्मिती आहे.मुलाला जन्म देऊ न शकणाऱ्या कुटूंबाची हि कहाणी वेगळ्या धाटणीने मांडलीय.राज्य नाट्य स्पर्धेत प्राथमिक आणि अंतिम फेरीत अभिनयाची रौप्यपदके पटकावल्यानंतर ओंकार पाटील यांचा आत्मविश्वास वाढलाय हे ओंकार पाटील ने कॉफिनचे केलेले दिग्दर्शन पाहिल्यावरून निश्चितच जाणवते. गुंतागुंतीचा,किचकट विषय प्रेक्षकांसमोर मांडताना ओंकारने स्व:ताच्या अभिनयाकडे बारकाईने लक्ष दिले आहेच त्याशिवाय सहकलाकारांकडून तितकीच मेहनत करून घेतलीय हे नाटकातील “फॉरेन फॉरेन” या विडंबनात्मक किर्तनाच्या प्रवेशावरून ठामपणे म्हणावंसं वाटते.मूल होत नसलेल्या बापाला मूल झालयं असं सांगून ते मूल इतरांपेक्षा वेगळं आहे.अगदी त्या मुलाला एलियन जन्माला आला अशी एक उपमा देण्यात आली.मूल विचित्र जन्माला आले तरी बाप आणि त्या मुलाच्या आजीला होणारा आनंद त्या कथानकाच्या सीमा वाढवतात.जन्मलेले मूल वेगळे आहे असून त्या मुलाला एका शवपेटीत म्हणजे कॉफ़िन मध्ये ठेवतात.म्हणून त्याला कॉफिन असे नाव पडते.
आजी आणि वडीलांच्या संपूर्ण भावना,इच्छा-अपेक्षा त्या कॉफिन भवती अडकतात.त्या शवपेटीला ते शाळेत घालतात.आजी कॉफिनला परदेशात पाठवायची स्वप्न बघते.कॉफिन नावाचं विचित्र बालक जन्माला आलयं हे समजताच टिआरपीसाठी धावणाऱ्या वृत्तवाहिन्या,बातम्या पसरताच वैज्ञानिक चमत्कार म्हणतं नासातून आलेले संशोधक,शवपेटीत काय आहे पहाण्याची उत्सुकता असलेल्या वृत्तवाहिन्या,शेजारी-पाजाऱ्यांच्या धडपडीत नाटक पुढे सरकते.जन्मलेले मूल पहाण्यासाठी अवकाशाचा अभ्यास करणारे नासाचे संशोधक येतात हे मजेशीर वाटलं तरी परग्रहावरून एलियन अवतरलाय या शोधात येतात असे सांगून लेखकाने ते उत्तम निभावलय.वृत्तवाहिन्यांचा आततायीपणा,टिआरपीसाठीची धडपड वाढविताना वार्ताहरापेक्षा कॅमेरामनलाच जास्त बातमीची जाण दिसते तर वार्ताहर शिकाऊ वाटतो.विनोदी निर्मितीचा भाग म्हणून हे सर्व ठिक होतं.
मुख्य भूमिकेत ओंकार पाटील ने सर्व प्रसंगात ‘बाप’ परफॉर्मन्स दिलाय.बापाचं दु:ख अभिनयातून उत्तम मांडलयं.शेवटच्या प्रवेशात जेव्हा तो स्वत: शवपेटीत जाऊन बसतो. तो प्रसंग अंगावर काटा उभा करतो.इंग्रजी भाषेतल्या डॅड आणि डैड या शब्दांचा खेळ लेखकाने उत्तम केलाय.ऋचा मुकादमने अस्सल आजी रंगवली.तीचं थरथरणं,गहिवरण,बाबा महाराजांकडे जाऊन नातवाच्या भवितव्याची स्वप्न पहाणं यातचं तिच्यातील आजीबाई अधिक जीवंत झाली.आंटीच्या भूमिकेत चंद्रकला कनोजिया भाव खाऊन गेली.आडनाव ‘कनोजिया’ असून तिची मराठी भाषा अधिकच प्रभावी वाटली.तिच्या शेवटच्या प्रसंगात ती आंटी अधिक प्रभाव टाकून गेली.पाश्चात्य अनुकरण करणारा माईकबाबा आणि त्यांच्या अनुयायी यांचा नाटकातील एकमेव प्रसंग प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात रहातो.अक्षय शिवगण,मनिष साळवी,गणेश राऊत,मयुरेश पाडावे,दुर्वेश सागवेकर,स्वप्नील धनावडे,तन्मय राऊत,स्नेहा भडकंबकर,श्रीनाथ मेस्त्री,संचिता जोशी,दिपेन भोजे,निशांत जाधव,मयुर साळवी,समर्थ पवार,प्रशांत पवार,शुभम शिवलकर,संकेत पवार,किरण राठोड,उदय मेस्त्री,स्वरूप शिर्सेकर,शिवानी जोशी,दामिनी वाडेकर यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या.साई शिर्सेकर याने रंगमंचावर चौफेर प्रकाशयोजना करत नवा प्रयोग केला.योगेश मांडवकर यांचे पार्श्वसंगीत आणि प्रदीप पेडणेकर यांची रंगभूषा उत्तम होती.प्रवीण धुमक यांच्या नेपथ्याचा पुरेपूर वापर यानाटकात केलाय.अजित पाटील यांची निर्मिती असलेल्या नाटकाचे संतोष गार्डी हे सुत्रधार होते.
ReplyForward