
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरीतील पाणीटंचाईने भीषण रुप धारण केले आहे. टंचाईग्रस्त गावांचे अर्धशतक तर टंचाईग्रस्त वाड्यांनी शतकी मजल मारली आहे. रत्नागिरी तालुक्यातील केळये गावामध्ये हंडाभर पाणी गोळा करण्यासाठी महिला आणि पुरुष थेट विहिरीतच उतरत आहेत. पाणी हे “जीवन” आहे पण “जीवनासाठीच” केळयेवासियांचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षाची चाहूल जिल्हा पाणीपुरवठा विभागाला लागलेली नाही. कारण जिल्हा पाणी पुरवठा विभागाच्या कागदावर रत्नागिरी तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गाव आणि वाड्यांची संख्या शून्य आहे.
रत्नागिरी तालुक्यातील केळये गावात पड्याळवाडी आणि सोलकरवाडीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सुमारे 90 कुटुंबे असलेल्या या दोन वाड्यांची लोकसंख्या सुमारे साडेतीने आहे. मे महिना सुरू होताच गावात पाणीटंचाईने रौद्ररुप धारण केले. गावातील विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. त्या तळातील पाणी काढण्यासाठी आता तर ग्रामस्थ चक्क विहिरीत उतरत आहेत.
दिवसभर मोलमजूरी केल्यानंतर रात्री बॅटरीच्या प्रकाशात ग्रामस्थ विहिरीवर जाऊन विहिरीतून पाणी काढतात ग्रामस्थ स्वतःच हंडे घेऊन सुमारे 30 फुट खोल विहिरीत उतरतात. जगण्यासाठी एकप्रकारची तारेवरची कसरत केळये गावातील ग्रामस्थ करत आहेत. विहिरीत उतरुन एक-दोन हंडे पाणी पिण्यासाठी घेण्याचा रोज रात्रीचा उपक्रम झाला आहे. प्रशासनाला अजून गावात टँकर पाठवायची इच्छा होत नाही. विहिरीत उतरुन पाणी काढणे हे जीवावर बेतू शकते. ग्रामस्थ पाण्यासाठी हा संघर्ष करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाणी टंचाई सुरु झाली आहे. तरी शासकीय कागदावर मंडणगड, राजापूर आणि रत्नागिरी या तालुक्यांमध्ये शून्य पाणी टंचाई दाखवली जात आहे. जिल्ह्यात केवळ दापोली, खेड, गुहागर, संगमेश्वर या गावातच पाणी टंचाई सुरु आहे.
































































