रिझर्व्ह बँकेचा नोटाबंदीला होता विरोध! माहिती अधिकारात उघड झाल्याचा काँग्रेसचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीला स्पष्ट विरोध केला होता असे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून उघड झाले असल्याचा दावा आज काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला. काँग्रेसची सत्ता आल्यास नोटाबंदी प्रकरणाची चौकशी करू, असेही त्यांनी सांगितले.

जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 8 नोव्हेंबर 2016 रोजी रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीतील निर्णय अडीच वर्षे दाबून ठेवण्यात आले. माहितीच्या अधिकारात मागवण्यात आलेल्या माहितीमध्ये रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीला स्पष्ट विरोध केला होता असे स्पष्ट होते असे सांगतानाच हा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या माथी मारण्यात आल्याचा आरोपही रमेश यांनी केला. या बैठकीत रिझर्व्ह बँकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीसाठी दिलेली सर्व कारणे फेटाळली होती. सोने आणि स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात बहुतांश काळा पैसा आहे. त्यामुळे या निर्णयाने काळ्या पैशांवर आणि बनावट नोटांवर नियंत्रण येईल हा दावाही रिझर्व्ह बँकेने नाकारला होता. इतकेच नव्हे तर पर्यटनाच्या व्यवसायाला मरणकळा येईल असा इशाराही रिझर्व्ह बँकेने दिला होता असे रमेश यांनी सांगितले.

उर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून तीन वेळा केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सामोरे गेले परंतु त्यांनी या बैठकीविषयी चकार शब्दही काढला नव्हता असे रमेश म्हणाले. नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून त्याने देशाची अर्थव्यवस्था बरबाद केल्याचा आरोप रमेश यांनी केला.