
पावणेचार कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करीत एमआयडीसी पोलिसांनी नगरमधील ‘पुष्पा’चा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी (दि. 3) रात्री पावणेनऊ वाजता ही मोठी कारवाई केली. या कारवाईत 7 टन 660 किलो रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. त्याची अंदाजे 3 कोटी 83 लाख रुपये किंमत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली. सदाशिव सीताराम झावरे (वय 45, रा. दूध डेअरी चौक, एमआयडीसी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दक्षिणात्य पुष्पा चित्रपटामुळे रक्तचंदन सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी दाखविण्यात आली असून, कशा पद्धतीने त्याची विक्री केली जाते, याबद्दल भाष्य करण्यात आले आहे. दरम्यान, वखार महामंडळ परिसरात एमआयडीसी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये रक्तचंदन बेकायदेशीर व विनापरवाना चोरून आणून लपवून ठेवलेले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आठरे यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून पथकाने या पत्र्याच्या शेडची झडती घेतली असता शेडच्या कोपऱयात बटाटय़ाच्या गोण्यांखाली रक्तचंदनाची लाकडे लपवून ठेवल्याचे आढळून आले. 3 कोटी 83 लाखांचे हे रक्तचंदन पोलिसांनी जप्त केले आहे. सदाशिव झावरे व त्याच्या तीन साथीदारांनी हे रक्तचंदन लपवून ठेवल्याचे पोलिसांना समजले. झावरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य तीन साथीदार फरार आहेत. झावरे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
उपनिरीक्षक दीपक पाठक, चांगदेव हंडाळ, सहायक फौजदार लोखंडे, राजेंद्र गायकवाड, हेडकॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे, पोलीस नाईक मच्छिंद्र पांढरकर, भास्कर मिसाळ, महेश दाताळ, कॉन्स्टेबल किशोर जाधव, सचिन हरदास, भगवान वंजारी, प्रशांत धुमाळ, गिरवले यांनी ही कारवाई केली.



























































