ट्रिप रद्द केल्यास चालकाला 1000 दंड, ओला-उबरवाल्यांसाठी नवा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

मोबाईल अॅपद्वारे कॅबसेवा देणाऱ्या कंपन्यांच्या मनमानीपणाला लगाम घालण्यासाठी मध्य प्रदेश सरकार लवकरच कायदा करणार आहे. अनेकदा कॅब बुक झाल्यानंतर गाडी नंबर, चालकाची माहिती पाठवण्यात येते. मात्र, अचानक कंपनी किंवा चालकाकडून ट्रिप रद्द करून प्रवाशाला सेवा नाकरण्यात येते. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. हे लक्षात घेऊन आता चालकाने किंवा कंपनीने बुक झाल्यानंतर ट्रिप रद्द केल्यास त्यांना एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयीसाठी हा कायदा करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच नव्या नियमानुसार कॅबचे दरही नियंत्रित करण्यात येणार आहेत. कॅबच्या दराबाबतच्या तक्रारी वाढत असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

कॅब बुक केल्यावर अनेकदा चालकाकडून रस्त्यातच कॅब थांबवण्यात येते. तसेच अनेकदा चालक चुकीच्या दिशेने कॅब नेतात. अशा घटना घडल्यास कंट्रोल रुमला अलर्ट मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायक प्रवासासाठी हे नियम करण्यात येणार आहेत. हे नियम ओला, उबरसह अॅपद्वारे चालणाऱ्या कॅबसेवा, रिक्षा, बाईक टॅक्सी सेवा यांनाही लागू असणार आहेत. त्याचप्रमाणे कमाल आणि किमान दरही निश्चित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.