
राज्यात जाणवणाऱया रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवडय़ाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱया सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱयांची बैठक घेतली. महाराष्ट्राला रेमडेसिवीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन दुप्पट करावे. रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिह्यात भरारी पथके नेमण्यात यावीत तसेच काळाबाजार होऊ नये म्हणून त्याची एमआरपी कमी करावी, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसिवीर उत्पादकांच्या बैठकीत दिल्या.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्याला सध्या दररोज 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता एका अंदाजानुसार एप्रिलअखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी उत्पादन दुप्पट करावे. कंपन्यांनी वाढीव उत्पादनाला सुरुवात केली असून त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन उत्पादन यायला किमान 20 दिवस लागतील. त्यानंतर राज्यात त्याचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या राज्यातील तुटवडय़ाची स्थिती लक्षात घेऊन काही कंपन्यांनी आयात करण्यासाठी ठेवलेला साठा महाराष्ट्राला देण्याचे मान्य केले आहे, मात्र पुढील काही दिवस इंजेक्शनच्या वापरावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 70 टक्के पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे.
थेट सरकारी रुग्णालयांना पुरवठा करा
सध्याच्या तुटवडय़ाच्या काळात या प्रमुख उत्पादक कंपन्यांनी इंजेक्शनचा पुरवठा थेट शासकीय रुग्णालयांना करावा. जिल्हाधिकाऱयांकडे त्याचा पुरवठा केल्यास त्यांच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यात येईल, अशी यंत्रणा करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. यामुळे काळाबाजार रोखण्यास मदत होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
किंमत निश्चित करणार
इंजेक्शनवरील छापील एमआरपी कमी कराव्यात, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात कुठेही 1100 ते 1400 रुपये या किमतीत रेमडेसिवीर मिळाले पाहिजे, असे सांगतानाच डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या कंपन्यांशी चर्चा करून इंजेक्शनची किंमत निश्चित करील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
लक्षणे नसलेल्या रुग्णांना इंजेक्शन देऊ नका
खासगी रुग्णालयांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन दिले जाऊ नये. त्याचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिह्यात निवासी उपजिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पथक खासगी रुग्णालयांना अचानक भेटी देऊन रेमडेसिवीर वापराबाबत माहिती घेतील, असे राजेश टोपे म्हणाले.
























































