उत्तर मुंबईतील धोकादायक स्कायवॉक दुरुस्तीचा मार्ग मोकळा, पालिका खर्च करणार 19.63 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर मुंबईतील धोकादायक स्कायवॉकच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासाठी पालिका 19 कोटी 63 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. स्कायवॉकच्या दुरुस्तीचा खर्च 16 केटी 62 लाखांवरून 19 कोटी 63 लाखांवर पोहचला आहे. या याबाबतच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीने मंजुरी दिली.

पालिकेच्या अनेक स्कायवॉकची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. त्याचा फेरीवाले, गर्दुल्ले यांनी ताबा घेतल्याने चालणे मुश्कील झाले आहे. 2020मध्ये दहिसर येथील स्कायवॉकचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर पालिकेने गोरेगाव पश्चिम, कांदिवली पूर्व, बोरिवली पश्चिम आणि दहिसर परिसरातील सर्व स्कायवॉकच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थायी तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार अंदाजपत्रक तयार केले. मात्र प्रत्यक्ष कामाच्या वेळी या खर्चात वाढ झाली. आजच्या प्रस्तावावर अनेक सदस्यांनी स्कायवॉकची दुर्दशा सांगितली. त्यामुळे पालिकेने स्कायवॉकच्या दुरुस्तीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एकमताने प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले.

स्कायवॉकची श्वेतपत्रिका काढा!

मुंबईतील स्कायवॉक म्हणजे ‘पांढरा हत्ती’ पोसण्यासारखे असल्याची टीका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. त्यामुळे मुंबईतील सर्व स्कायवॉकची तपासणी करावी, स्कायवॉकचा वापर किती लोक करतात याची सविस्तर माहिती घेऊन श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही रवी राजा यांनीं केली. या वेळी शिवसेनेच्या सुजाता पाटेकर यांनी बोरिवली स्कायवॉकची दुर्दशा निरदर्शनास आणली. या स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने प्रवाशी-नागरिकांना या ठिकाणाहून जाताना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या स्कायवॉकच्या पायऱया, सुरक्षेचे लोखंडी रॉड अनेक ठिकाणी तुटल्याने धोकादायक झाल्याचे सांगितले. या वेळी भाजपच्या राजश्री शिरवाडकर, ज्योती अळवणी यांनीदेखील आपापल्या विभागातील स्कायवॉकची दुरवस्था स्पष्ट केली.