स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक आढळलेल्या नऊ पुलांची दुरुस्ती करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

शहर आणि पश्चिम उपनगरातील नऊ धोकादायक पुलांची संरचनात्मक दुरुस्ती हाती घेण्याचे पालिकेने ठरवले आहे. महाडच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने मुंबईतील पुलांचे जे सर्वेक्षण केले होते त्यात धोकादायक आढळलेले हे पूल आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतील केनेडी पूल, केम्प्स कॉर्नर पूल, प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाचा समावेश आहे.

सन 2016 च्या ऑगस्टमध्ये महाडच्या सावित्री नदीवरच्या पुलाचा भाग वाहून गेला. या भीषण दुर्घटनेनंतर मुंबईतील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने मुंबईतील 296 पुलांच्या सर्वेक्षणासाठी सल्लागारही नेमले होते. अंधेरीच्या गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर या सर्वेक्षण कामाने पुन्हा वेग घेतला. या सर्वेक्षणात तब्बल 18 पूल धोकादायक आढळले असून ते दुरुस्तीच्याही पलीकडे आहेत. हे सर्व पूल पाडून टाकणे गरजेचे असल्याची गंभीर बाब उघड झाली होती. तर 61 पुलांची संरचनात्मक मोठी दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे आढळून आले होते. यापैकी नऊ पुलांची दुरुस्ती पालिकेने हाती घेतली आहे. सी, डी, एच आणि के या विभागातील हे पूल आहेत. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे. पालिका याकरिता 32 कोटी रुपये खर्च करणार आहे.

या पुलांची होणार दुरुस्ती

  • प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल
  • विद्याभवन पादचारी पूल
  • केम्पस् कॉर्नर उड्डाणपूल
  • केनेडी पूल आरओबी
  • रे रोड आरओबी
  • जुहू तारा रोड, एस.एन.डी.टी.जवळ
  • धोबीघाट, मजास नाला
  • लोखंडवाला कॉम्प्लेक्स कामत क्लब जवळ
  • एकूण पुलांचे सर्वेक्षण- 296
  • उत्तम स्थितीत असलेले पूल-110
  • मोठय़ा दुरुस्तीची आवश्यकता असलेले पूल- 61
  • छोटय़ा दुरुस्तीची आवश्यकता असलेले पूल-107