वडवळ परिसरातील कृषी विभागामार्फत दुरूस्त केलेले बंधाऱ्यांचे काम निकृष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वडवळ नागनाथ

वडवळ नागनाथ शिवारात जलयुक्त योजनेअंतर्गत दोन वर्षापूर्वी नाला सरळीकरण व खोलीकरणाचे काम झाले. यानंतर प्रशासनाने जलयुक्त योजनेअंतर्गत या नाल्यावरील बंधारे दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी दिला गेला. बंधारे दुरुस्तीचे काम कृषी विभागामार्फत ऑनलाइन निविदा मागवून करण्यात आले. मात्र काम सुरू असताना कृषी विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळेच दोन महिन्यापूर्वी दुरुस्त केलेले वडवळ नागनाथ शिवारातील बहुतांश बंधारे पहिल्याच पावसात वाहून गेल्याने शासनाने लाखो रूपये केलेला खर्च पाण्यासोबत वाहून गेला आहे.

लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शासनाच्या वतीने राज्यभर जलयुक्त शिवार योजना राबविली. या योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे यासाठी शासनाने विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, या योजनेचा चांगला फायदा होईल म्हणून वडवळ येथील अनेक शेतकऱ्यांनी २०१६ मध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही लाखो रुपये जमा करून शिवारातील वेगवेगळ्या नाल्याचे रुंदीकरण व सरळीकरणाचे काम केले. याच नाल्यावर असणाऱ्या नऊ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जलयुक्त् योजनेअंतर्गत अकरा लाख रुपये खर्चून बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र दुरुस्ती निकृष्ट दर्जाची झाली असल्याने दोन महिन्यापूर्वी दुरुस्त केलेल्या बंधाऱ्यालगत असणारा भराव व बंधाऱ्याचा गिलावा (मुलामा ) पहिल्याच पावसात वाहून गेला असल्याने कृषी विभाग व ठेकेदाराचे पितळ उघडे पडले आहे.

एकीकडे शासन शिवारातील पाणी शिवारातच झिरपण्यासाठी जलयुक्त योजना, तर गावातील पाणी गावातच झिरपण्यासाठी शोष खड्डे अशा वेगवेगळ्या योजना राबवत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा मित्र म्हणवुन घेणार्‍या कृषी विभागाचे अधिकारी कसा हलगर्जीपणा करतात ते दोन महिन्यापूर्वी दुरूस्त केलेल्या बंधाऱ्याच्या कामाच्या दर्जा वरून स्पष्ट दिसून येते.

यावर्षी परिसरात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला. जलयुक्त योजना, पाणलोट योजना, इंद्रप्रस्थ जलयुक्त शिवार जलयुक्त आवार आदी योजनेतून आपले शिवार जलमय होवून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतू बंधाऱ्यांच्या निकृष्ट दुरूस्ती कामाकडे कृषी विभागाने संगनमताने दुर्लक्षच केल्यामुळे शिवारातील पाणी वाहून गेले असल्याची शेतकऱ्यांत चर्चा होवून संताप व्यक्त होत आहे. या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी स्थानिक पुढाऱ्यांनी व सेवाभावी संस्थेने पुढाकार घ्यावा, अशी आर्त हाक शेतकऱ्यांतून दिली जात आहे.