
>> अस्मिता येंडे
लेखिका राजश्री चतुर्वेदी लिखित ‘जपान: आठवणींचा कोलाज’ हे प्रवासवर्णनपर पुस्तक वाचलं आणि जपान या देशाचं मूळ अस्तित्व आणि ओळख झाली. या प्रवासवर्णनपर पुस्तकाचे शब्दांकन आरती पाध्ये यांनी केले असून त्यांच्या शब्दसौंदर्याने लेखिकेच्या दृष्टीतला जपान अधिक सुरेख भासतो आहे. लेखिका या जपानी भाषा शिकवतात आणि त्यांनी भाषांतरकार, दुभाषी म्हणून काम केलेलं आहे. लेखिका प्रबंध अभ्यासासाठी जपानला गेल्या त्यावेळी तेथे वास्तव्यास असताना जो जपान त्यांनी अनुभवला तो त्यांच्या मनात कायमचा विसावला. का बरे? म्हणजे वेगवेगळ्या निमित्ताने त्या अनेक देशांत गेल्या, तेथे राहिल्या, पण जपानच त्यांच्या मनाला का भावला किंवा तिथे त्यांना आपलेपणाची भावना का जाणवली, या प्रश्नांचं उत्तर दडलंय ‘जपान ः आठवणींचा कोलाज’ या पुस्तकात.
जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते. कोणत्याही देशाबद्दल जाणून घेण्यासाठी किंवा तेथे राहण्यासाठी तेथील भाषा येणे आवश्यक आहे. संवाद साधण्याचं ते एकमेव साधन आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला जपानी भाषा शिकण्यापासून लेखिकेचा प्रवास सुरू होतो. जपानी भाषेची वर्णमाला, सांकेतिक खुणा, चिन्ह, त्यांचे अर्थ, म्हणी यांची ओळख या पहिल्या प्रकरणात करून दिली आहे.
या प्रवासवर्णनाची 25 प्रकरणांत विभागणी केली असून प्रत्येक प्रकरणातून जपान अधिक उमगत जातो. प्रथमपुरुषी निवेदन, सहज ओघवती भाषाशैली आणि महत्त्वपूर्ण ठिकाणी बोधपर कथा, गोष्टीचा केलेला सुयोग्य वापर यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे. जपानमध्ये राहताना बरेच अनुभव आले. अनेक आठवणी निर्माण झाल्या. त्याच आठवणी या पुस्तकरूपात सामावून घेतल्या आहेत. जेणेकरून या पुस्तकाद्वारे पुन्हा जपानमय होता येईल.
जपान देशाचा इतिहास, त्याची भौगोलिक रचना, तेथील कायदे, नियम याविषयी सखोल माहिती या पुस्तकात मिळते. त्सुनामी, भूकंप याची कल्पना ठेवून केलेली तेथील घरांची रचना, सजावट, प्रत्येक कामाची ठरलेली विशिष्ट वेळ यामुळे जपानी लोकांची दुरदृष्टी कळते. तेथील राहणीमान, लोकजीवन, खाद्यसंस्कृती, वैचारिक दृष्टिकोन, पेहराव, तेथील करमणुकीची साधने, संगीत, क्रीडा प्रकार, त्यांच्या देवदेवता, तेथील सण-उत्सव, परंपरा, रूढी, स्त्राr-जीवन, निसर्गाविषयीची कृतज्ञता याची क्रमवार आणि साचेबद्ध माहिती लेखिकेने करून दिली आहे. बरे, या सगळ्या गोष्टीशी जुळवून घेताना लेखिकेची होणारी तारेवरची कसरत आणि त्यातून मिळणारा आनंद निर्मळ आहे.
जपानी लोकांचा खास गुण म्हणजे पाहुण्यांचं योग्य प्रकारे आदरातिथ्य करणे. कमरेत वाकून समोरच्या व्यक्तीला मान देणे, अभिवादन करणे. त्यांची खाली पाय दुमडून बसण्याची विशिष्ट पद्धत, त्यांचं मितभाषी असणं, त्यांचं कृतीतून व्यक्त होणं आणि छोटय़ा छोटय़ा गोष्टीना महत्त्व देणं या गोष्टी खरेच शिकण्यासारख्या आहेत. तेथे जेवताना ज्या चॉपस्टिक वापरल्या जातात, त्या वापरण्याची योग्य पद्धत, त्यामागच्या जपानी लोकांच्या भावना आश्चर्यचकित करतात.
या पुस्तकातील सगळ्यात भावलेलं प्रकरण म्हणजे अमृतपान. आपल्याकडे जसे घरी आलेल्या पै-पाहुण्यांना चहा देणे औपचारिकता असते, पण जपानमध्ये चहापान म्हणजे एक प्रकारे उत्सवच असतो. सगळ्यांनी एकत्र जमून हा चहापानाचा कार्यक्रम प्रेमाने, उत्साहाने आणि नेमकेपणाने साजरा केला जातो. या प्रत्येक कृतीतून जपानी संस्कृती झळकते. गंमत म्हणजे ‘साके’ हा एक मद्याचा प्रकार असणारे पेय. जपानमध्ये या पेयाला विशेष महत्त्व आहे. तेथील प्रत्येक सण-समारंभ तसेच पूजेतसुद्धा साकेला सामाजिक स्थान आहे. निसर्गाप्रति कृतज्ञता भाव जपणारे आणि निसर्गाचा आदर करणारे जपानी ‘साकुरा’ या प्रकरणात भेटतात. साकुरा या फुलांचं बहरणं, त्या फुलांचं सौंदर्य आणि त्या फुलांपासून बनवलेल्या वस्तू किंवा त्या फुलांनी नक्षीकाम केलेल्या चीजवस्तू किती सुंदर वाटतात. जपानमधील कला ओरोगामी, किरिगामी, त्यांची लेखनपद्धती, निर्जीव वस्तूत भाव ओतण्याची त्यांची किनत्सुगी कला जीवनाची सकारात्मकता आहे. हे पुस्तक वाचताना त्यात आपलेपणाची भावना जाणवते, कारण प्रत्येक प्रकारणाची सुरुवात करताना लेखिकेने आपल्या बालपणीच्या सुसंगत आठवणीसुद्धा यात जोडल्या आहेत. ‘किमोनो’ हा जपानी लोकांचा पारंपरिक पेहराव. या किमोनोच्या कापडाचे पोत, रंगसंगती, विविध प्रकार, नक्षीकाम याची ओळख करून दिली आहे. अर्थात आपल्या पेहरावातून आपल्या संस्कृतीचं दर्शन घडत असतं. जपानी लोकांच्या समजुती, भावना या सकारात्मक भाव जपताना दिसतात. ‘जपानी बाहुली’ या प्रकरणात बाहुल्यांचे विविध प्रकार, त्यांचं महत्त्व, त्यामागील त्यांची श्रद्धा विलक्षण आहे.
जपानमधील प्रेक्षणीय स्थळे, तेथील मंदिरे, जपानी लोकांच्या श्रद्धा, भावना, त्यांचं अध्यात्म किती खोलवर रुजलं गेलं आहे, हे पुस्तक वाचताना जाणवतं. यात लेखिकेने झेन तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली आहे. पुस्तकात बोधपर झेनकथा लेखिकेने समाविष्ट केल्या आहेत. मानवी जीवन सार्थकी लावण्यासाठी आपण आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी आत्मसात करायल्या हव्यात, याची सोपी व्याख्या समजून सांगणारे तत्त्वज्ञान या पुस्तकात समाविष्ट आहे. जपानी लोकांचं दीर्घायु असण्याचं रहस्य, त्यांची शरीरयष्टी, जपानमधील रस्ते, पर्वत, नद्या, बाग-बगिचे, तेथील हवामान, दळणवळणाच्या सोयी, तेथील कार्यालये, नियम, शासन व्यवस्था, नातेसंबंध इत्यादी यथासांग माहिती या पुस्तकात दिलेली आहे. लेखिकेसोबत वाचकही जपानमय होतील, हे नक्की.
आणखी किती आणि काय सांगू? अशी अवस्था झालेली आहे. जपानबद्दल इतकी माहिती वाचल्यानंतर वाचकांना पुस्तक वाचण्याचा मोह नक्की होईल. जपानबद्दल फक्त जुजबी माहिती न देता त्याला ललितगद्याचं सुरेख स्वरूप दिल्याने वाचक त्यात गुंततो. जपान न पाहिलेल्या आरती पाध्ये यांनी आपल्या शब्दांतून लेखिकेला अभिप्रेत असलेला, त्यांच्या दृष्टीतला आणि आठवणींतला जपान अगदी तंतोतंत उतरवला आहे. लेखिकेने जपानच्या प्रत्येक गोष्टीच्या इतक्या बारीक सारिक नोंदी आपल्या मनात जपल्या आहेत. त्या वाचून त्यांचं जपानबद्दलचा विशेष स्नेह जाणवतो. जपानी संस्कृतीची ओळख या पुस्तकातून होते आणि जपानची शाब्दिक सफरही घडते.
जपानमध्ये कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी वा वास्तव्य करण्यासाठी जाणाऱया व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. लेखिकेच्या या जपानमय आठवणींचा वाचकही सहप्रवासी म्हणून एक भाग होतील, हे नक्की!
जपान : आठवणींचा कोलाज
लेखिका: राजश्री चतुर्वेदी
शब्दांकन: आरती दीपक
प्रकाशक: उदवैली बुक्स
मूल्य: रुपये 525/-






























































