गझल-गीतांचा आविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अलूफ’ हा ज्येष्ठ कवी. सदानंद डबीर यांचा नवा गझल-गीतसंग्रह. आतापर्यंत त्यांचे ‘लेहरा’, ‘तिने दिलेले फूल’, ‘खयाल’, ‘आनंदभैरवी’, ‘काळिजगुंफा’ हे गझल, गीतिका, मुक्तके, कविता, गाणी यांचा समावेश असलेले काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यातील काही फक्त गझलसंग्रह आहेत. कविवर्य सुरेश भट यांनी गझल मराठीत रुजवल्यानंतर त्या वाटेवरून चालणाऱया कवींच्या भाऊगर्दीत हाताच्या बोटावर मोजता येणारे कवी बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या गझलची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यात अग्रगण्य नाव होते सदानंद डबीर. डबीरांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्याकडे भरपूर शब्दसंग्रह आहे आणि गझलेत नेमका अचूक शब्द योजण्याची शैली हे त्यांचं वैशिष्टय़ आहे. शब्दांची निवड ते किती काळजीपूर्वक करतात ते पाहण्यासारखं असतं. त्यात नजाकत असते. शब्द, लय, प्रतिमा यांच्याद्वारे सौंदर्यनिर्मिती करताना ते गझलेतील भाव आणि तिची तरलता जपताना दिसतात. एखाद्या शब्दावरचा श्लेष, निवडलेले वृत्त, प्रसादगुण हा सारा त्या गझलेचा आविष्कार रसिकाला सौंदर्यानुभूतीचा अपूर्व अनुभव देतो. त्यांची गझल अजिबात शब्दबंबाळ नसते. याचे कारण ते शब्दांची ताकद, सामर्थ्य आणि त्याचे हळुवारपण ओळखतात. त्यांच्या गझलेत अचूक शब्द अचूक जागी असतो. म्हणूनच ते म्हणतात-

शोधीत मला आलेले, हे शब्द कसे नाकारू?
बघ, ओंजळ भरली माझी, लखलखत्या नक्षत्रांनी
‘गझल’ या काव्यप्रकाराची पूर्ण जाणीव त्यांना आहे. ‘गझल’ कशी जन्माला येते हे ते अचूक सांगतात.
गझल जगण्यातून येते, इथे जगणेच वरवरचे
मुलामा फक्त दुःखाचा, ‘कळा’ ना सोसल्या देवा
गझला तरी दिलकश कुठे राहिल्या आहेत हे सांगताना
दुकाने खेळण्यांची ही ‘कसरती’ काफियासाठी
पहाना ‘शब्द भातुकल्या’ कशा या रंगल्या देवा
अशी खंत ते व्यक्त करतात.

सुरेश भटांचा आग्रह असायचा की मराठी गझलेत मराठमोळय़ा संस्कृतीची निगडित प्रतिमा, प्रतीकं वापरली पाहिजेत. डबीरांच्या गझलेत ते प्रकर्षाने जाणवतं. केवळ तरल शृंगारच नाही तर कधी सौंदर्यपूर्ण शारीर वर्णनही ते इतक्या नजाकतीने करतात की रसिकांकडून नकळत दाद दिली जाते.

पाहुनी तो चेहऱयाचा चांदवा
आरसाही बोलला की वाहवा!
यौवनाने निरखलेले रूप ते
आरशापुढती जणू जळता दिवा!
न्हायलेले केस सुटता मोकळे
दर्वळाया लागलेली ही हवा!
उष्ण श्वासांची सुगंधी रात्र तू
तू पहाटे चंद्रशीतल गारवा!

त्यांची ‘छांदस’ संग्रहातील ‘गझल’ कधीच विसरता येत नाही. मराठमोळी गझल कशी असावी याचा आदर्श म्हणून तिचा उल्लेख अपरिहार्य.

गव्हाळी गौर रंगाला नव्हाळी सोनचाफ्याची
सणाला गौर मांडावी असा तो चेहरा आहे

उत्कट प्रेमाइतकाच विरहाचा आविष्कारही डबीरांची गझल उत्कटपणे करते. प्रेम, सौंदर्य, विरह, मैत्री, शत्रुत्व, भक्ती, दुःख, सामाजिक वेदना यांपैकी कोणतीही भावना गझलशैलीत आविष्कृत करताना तिचा ‘आवाजी बाज’ टाळून ‘तीक्र’ तरीही तिची संयत अभिव्यक्ती करणे हे डबीरांचं वैशिष्टय़ आहे. म्हणूनच त्यांच्या गझलेत कवितेची आशयघनता आणि गीताची कर्णमधुरता असते. ‘खयाल’ संग्रहापासून त्यांच्या गझलेत अलगदपणे शैलीपरिवर्तन होत गेलं. ‘अलूफ’मध्ये तर ती उत्तरोत्तर गंभीर, चिंतनात्मक, जीवनविषयक प्रश्नांचा मागोवा घेणारी अभिव्यक्ती करते. गझलेतील चित्रमय शैली आणि सूक्ष्म विरोधाभास नजरेत भरतो. त्यांच्या सौंदर्यवृत्तीचा प्रत्यय सतत येत राहतो. आपण एक ‘कलाकृती’ निर्माण करत आहोत याचं विलक्षण भान ते जपत असल्याचं जाणवतं. त्यांचा पिंड जीवनसन्मुख रचनांमधून जाणवतो. तरल तत्त्वचिंतक आणि ‘इश्किया बाज’ याचा सुरेख संगम ते साकारतात. अर्थांची अनेक वलये उभी करतात. साधा आशय, सोपी शब्दकळा, मिश्किल वृत्ती, जीवनाकडे नकारात्मक नव्हे तर सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय, दुःखाचा समंजस स्वीकार त्यांच्या संग्रहात दिसतो.

अंतरीचा मूक टाहो ना तुला कळणार माझा
आसवांना चेहऱयाचा… हासरा शेजार आहे!
किंवा
पाऊस येता लावून घेतो खिडकी मी
कोसळणाऱया मनमेघाचे काय करू?

इतकी तरलता आणि संवेदनक्षम वृत्ती हेच त्यांचं सामर्थ्य आहे. या संग्रहातील गझल, गीतिका, मुक्तके, हझल, कविता, गाणी अनुभवताना अबोल प्रेमापासून सामाजिक वेदनेपर्यंत त्यांच्या काव्याचा प्रवास ही एक तृप्त करणारी अनभूती आहे. तिचा रसास्वाद घेण्यात खरी मजा आहे.

अलूफ (काव्यसंग्रह)
कवी – सदानंद डबीर
प्रकाशन – ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठ – 120, मूल्य – 125 रुपये