‘भल्या माणसा’चे आत्मकथन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भाऊराव कदम

दुबईला जाणे आता नावीन्याचे राहिलेले नाही. म्हणजे खिशात पैसा आणि पासपोर्ट-टुरिस्ट व्हिसा असेल तर कुणीही जिवाची दुबई करून येऊ शकतो, मात्र 33 वर्षांपूर्वी तसे चित्र नव्हते. धनंजय दातार नावाचा एक तरुण अमरावतीतील शिरखेड ते दुबई व्हाया मुंबई सांताक्रुझ असा प्रवास करत आज ‘मसाला किंग’ झाला. त्या प्रेरणादायी प्रवासाचे आत्मकथन नुकतेच वाचनात आले आणि तीन तास दूर असणारी दुबई खूप जवळ आली.

धनंजय दातार यांचे ‘मसाला किंग’ हे पुस्तक आत्मचरित्र नव्हे तर आत्मकथन आहे. जीवन प्रवासाचे समग्र चित्रण आहे. दातार हे मूळ कोकणातील, पण कोकणातील गाव कोणते हे शोधण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत आणि ‘किंग’ होण्यासाठी त्यांना तशी गरजही वाटली नाही. दातार आज आखाती देशातील श्रीमंत हिंदुस्थानी उद्योगपतींपैकी एक आहेत. ‘फोर्ब्स’सारख्या मासिकानेही त्यांचा यादीत समावेश करून गौरव केला आहे. पण ही श्रीमंती, हा गौरव वडिलोपार्जित वा सहज मिळालेला नाही, तर त्यामागे प्रचंड मेहनत आणि ध्यास आहे. ‘मसाला किंग’ हा त्याच ध्यासाचा लिखित इतिहास आहे. दातार यांच्या मालकीचा ‘अल अदील’ हा बहुराष्ट्रीय समूह. अल अदील म्हणजे भला माणूस. तेहत्तीस वर्षांत 40 सुपर स्टोअर्स, 2 मसाला कारखाने, एक पीठ गिरण, एक आयात-निर्यात कंपनी असे सगळे वैभव दातार यांनी केवळ ‘भला माणूस’ या शिदोरीवर उभे केले. त्या ऐश्वर्याच्या उभारणीचा प्रवास म्हणजे हे आत्मकथन आहे.

शिरखेडच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणानंतर मुंबईच्या सांताक्रुझमधील महापालिकेच्या शाळेतील शिक्षण, मुंबईकरांना न झेपणारा दातारांचा खेडवळपणा या सर्वांवर मात करत त्यांनी गाठलेली दुबई, पण तरीही मुंबईशी नाते तुटलेले नाही. चिंचा आणि फिनेल विकून सेल्समन म्हणून सुरू झालेला प्रवास आता बिझनेसमधून स्थिरावला आहे. पण हा प्रवास सरळसोट नाही हे पुस्तक वाचताना पानोपानी जाणवते. एखाद्या हिंदी चित्रपटाप्रमाणे तो धक्कादायक वळणांचा आहे.

हे पुस्तक नवउद्योजकांना काही तरी शिकवणारे नसले तरी त्यांना प्रेरणादायी ठरेल असेच आहे. यशाला शॉर्टकट नसतो हे जितके खरे आहे तितकेच ते मिळवण्यासाठी काहीही उशीर झालेला नसतो, हा दिलासा पुस्तकातून सातत्याने मिळतो. दातारांच्या आयुष्यातील व्यवसाय आणि समाज टप्प्याटप्प्याने आपल्याला भेटतात, पण त्यांचे आई-बाबा, पत्नी आणि दोन अनमोल रतन यांच्या सहभागाचे विविध पैलूही उलगडले जातात. दातार यांना जर कधी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला तर ते तुम्हाला सर्व काही मनमोकळेपणाने सांगतील, पण किती श्रीमंत आहात असे विचारले तर ते मंद स्मित करतात. मोनालीसाच्या हास्यासारखेच या हास्याचे तुमच्या परीने अर्थ लावायचे असतात. पुण्याच्या रसिक आंतरभारतीने हे पुस्तक प्रकाशित केले असून अवघ्या शंभर रुपयांच्या स्वागतमूल्याचे हे पुस्तक संग्रही ठेवायला काही हरकत नाही. या आत्मकथनाची जमेची बाजू अधिक असली, पुस्तकाची मांडणी आणि भाषाशैली सहज असली तरी एखादा चित्रपटमध्येच माहितीपट वाटावा तसे काही तरी होते. तरीही दातार यांच्या जीवन प्रवासाचा ‘मसाला’ फक्कड आणि झणझणीत जमला आहे.

मसालाकिंग
लेखक – डॉ. धनंजय दातार
प्रकाशन – रसिक आंतरभारती, पुणे
किंमत- 100 रुपये