
>> क्षितिज झारापकर
मिस्टर आणि मिसेस लांडगे… विजय केंकरे आणि सुरेश जयराम या दोन मातब्बर मंडळींच्या हातून उभे राहिलेले नवे कोरे नाटक.
कलाविश्वात कालांतराने काही जोड्या जमतात. अशीच एक जोडी सध्या मराठी रंगभूमीवर जमलेली आहे. सुरेश जयराम हे नाटककार आणि विजय केंकरे हे दिग्दर्शक. या जोडीची दोन नाटकं सध्या रंगभूमीवर जोरात चालू आहेत. दोन्ही नावं तशी स्वतंत्रपणे मोठी आहेत, पण या दोघांनी सध्याच्या त्यांच्या दोन नाटकांमधून एक नवीन फॉर्म्युला शोधून काढलाय. असा प्रकार नव्वदच्या दशकात केदार शिंदे आणि संतोष पवार यांनी वेगवेगळ्या नाटकांतून केला होता. नाटक हा समाजमनाचा आरसा असतो असं म्हणतात. समाजमनाचा वेग वाढतो तसा मग नाटकांचा वेगही बदलायला हवा. ‘तू तू मी मी’ आणि ‘यदाकदाचित’ या नाटकांनी नव्वदीत हे साधलं आणि हिट झाली. आता विजय केंकरे आणि सुरेश जयराम यांनी फार्स या नाट्य प्रकाराला खूप वेगवान करून हा नवा फॉर्म्युला योजलेला दिसतोय.
मुळात विजय केंकरे हे फार्सच्या प्रेमात असलेले दिग्दर्शक. त्यांनी आजवर अनेक फार्स दिग्दर्शित केलेले आहेत. चांगला फार्स जमवणं हे अत्यंत कठीण काम आहे. फार्सची तर्कसंगती वेगळीच असते. प्रारंभी ती प्रेक्षकांना पटवून द्यावी लागते. एकदा ते झालं की, मग आपण आपल्या फार्सपुरती आखलेली तर्काची रेफरन्स फ्रेम सतत लक्षात ठेवून तो फुलवावा लागतो. पात्रांच्या कॅरेक्टरॅस्टिक्सप्रमाणे नटांना खुलवावं आणि दाबावं लागतं आणि इतकं केल्यावर मग कुठे फार्स रसिकमान्य होण्याची चिन्हं दिसतात, पण केंकरेंना असली आव्हानं खूप आवडतात आणि त्यांना ही चॅलेन्जेस स्वीकारणारे, पेलणारे आणि टी-20 सामन्यासारखा स्ट्राईक रेट सांभाळून खेळणारे नटही सापडतात. सुरेश जयराम हे मराठी रंगभूमीवरचे संपन्न नाटककार आहेत. वेगवान नाटकं लिहिणं हा त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी मराठी रंगभूमीवरची अव्वल दर्जाची सस्पेन्स नाटकं लिहिली आहेत. ‘षड्यंत्र’, ‘वैशाली कॉटेज’, ‘डबल गेम’, ‘हॅन्डस् अप’ ही त्यांचीच नाटकं. सस्पेन्स लिहायचा तर लेखकाची तर्काची चांगली पकड हवी. हे सुरेशजींचं कसब आता फार्स लिहिताना खूप उपयोगी पडतं. त्यांचे फार्स हे वेगवान आणि आखलेल्या तर्क चौकटीत चपखलपणे बसणारे असतात. म्हणूनच विजय केंकरे आणि सुरेश जयराम यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून उभा राहिलेला नवाकोरा फार्स फर्मास जमलेला आहे.
‘मिस्टर आणि मिसेस लांडगे’ हे नाटक या हिवाळ्याच्या नाट्य मोसमात आलेल्या पहिल्या नाटकांपैकी आहे. गौरव आणि सन्मानांच्या हंगामात सामील होण्यासाठीची भाऊगर्दी सुरू होण्यापूर्वी ‘मिस्टर आणि मिसेस लांडगे’ रंगभूमीवर उतरलं. या दोन अंकी नाटकात दोन्ही अंकांची व्यवस्थित आखणी केली गेली आहे. पूर्वार्ध हा सेटअप तयार करण्यासाठी आहे आणि उत्तरार्ध घटना घडवून त्यांची उकल करण्यासाठी आहे. म्हणजेच ‘मिस्टर आणि मिसेस लांडगे’ हे एक वेल क्राफ्टेड नाटक आहे. याचं श्रेय सुरेश जयराम यांना द्यायला हवं. त्यानंतर हे वेल क्राफ्टेड नाटक उभं करताना त्यात धम्माल घडवून विजय केंकरे यांनी ‘मिस्टर आणि मिसेस लांडगे’ हा फार्स भन्नाट फुलवलाय. एक सामान्य उच्च मध्यमवर्गीय दांपत्य लांडगे, त्यांचे स्नेही आणि बिझनेस पार्टनर दांपत्य कोल्हे, लांडग्यांचं घर रिनोव्हेट करणारा डिझायनर, लांडग्यांच्या घरातली मोलकरीण आणि दोन बाहेरची पात्रं असा बेत असलेला ‘मिस्टर आणि मिसेस लांडगे’ हा फार्स. कोल्हे दांपत्य हे दोघेही थोडे बाहेरख्याली. दोघांची वेगवेगळी प्रकरणं चालू आहेत आणि दोघांनी लांडग्यांचं घर त्यासाठी वापरायचं ठरवलंय. नवरा मिस्टर लांडग्यांची आणि बायको मिसेस लांडग्यांची परवानगी मागतात आणि परस्पर गोंधळ सुरू होतो. त्यात लांडगे आणि कोल्हे पब्लिशिंग हाऊसकडे आपलं पुस्तक देऊ केलेल्या एक प्रख्यात लेखिकाही येतात आणि गोंधळ वाढतो.
साधा, सरळमार्गी मिस्टर लांडगे सुशांत शेलारने छान रंगवलाय. विशेषतः उत्तरार्धात जिथे मिसेस लांडगेंचं लफडं आहे असं वाटू लागतं तेव्हा झालेली घालमेल सुशांतने मस्त दाखवली आहे. परी तेलंग मिसेस लांडगेचा लाडिकपणा उत्तम साकारते. सरळमार्गी तरीही पेज थ्री संस्कृतीशी जुळवून घेणारी मिसेस लांडगे परी मूर्तिमंत उभी करते. ही अभिनेत्री खरोखर गुणी आहे. पाठोपाठ दोन नाटकांमध्ये तिने बहिणाबाई आणि मिसेस लांडगे या दोन अत्यंत भिन्न व्यक्तिरेखा लीलया पेलल्या आहेत. मिस्टर कोल्हेच्या इरसाल भूमिकेत राजेश भोसले नाटकभर धुमाकूळ घालतो. मधुरा देशपांडे ही मिसेस कोल्हे मस्त पेश करते. मुळात ‘मिस्टर आणि मिसेस लांडगे’ या फार्सच्या प्लॉटची सुरुवात तिच्यापासून होते. वाढत जाणार्या गोंधळात भर टाकत मधुरा देशपांडे नाटकात आपली छाप ठेवण्यात यशस्वी होते. उत्तरार्धात येणार्या मिस ढमढेरे या प्रख्यात लेखिकेच्या भूमिकेत रमा सोहोनी-रानडे चपखल बसून भाव खाऊन जाते. विक्षिप्तपणाचं एक मनोरंजक अर्कचित्र रमाने उभारलंय आणि हे भावतं. अलका परब, प्रियांका कासले आणि अमर कुलकर्णी हे आपापली पात्रं खूप मस्त रंगवतात. ‘मिस्टर आणि मिसेस लांडगे’मध्ये लक्षवेधी ठरतो तो मराठी बिग बॉस फेम आस्ताद काळे. एकतर आस्ताद एक मनस्वी कलावंत आहे. फार्स प्रकारात तो कसा बसतो ही उत्सुकता होती. इथे आस्तादने एक थोडी वेगळी भूमिका केली आहे. ‘फादर ऑफ द ब्राईड’ या चित्रपटातल्या मार्टिन शॉर्टची आठवण व्हावी असा अभिनय आस्तादने इथे केलाय. मुख्य म्हणजे आस्तादने हे सगळं कमालीच्या सहजतेने केलंय.
दिनेश मेस्त्री, अभय मोहिते, शीतल तळपदे, आमीर हडकर, मंगल केंकरे या मातब्बर मंडळींनी ‘मिस्टर आणि मिसेस लांडगे’ या फार्सची तांत्रिक बाजू व्यवस्थितपणे सांभाळली आहे. या सगळ्यामुळेच कल्पना कोठारी यांनी रंगनील संस्थेमार्फत निर्मित केलेलं ‘मिस्टर आणि मिसेस लांडगे’ हे मस्तपैकी जमलेलं नाटक आहे.
नाटक : मिस्टर आणि मिसेस लांडगे
निर्मिती : रंगनील
सादरकर्ती निर्माती : कल्पना कोठारी
निर्मिती प्रमुख : मनाली रायसोनी
दिग्दर्शक : विजय केंकरे
लेखक : सुरेश जयराम
नेपथ्य : दिनेश मेस्त्री
संगीत : अमीर हडकर
प्रकाश योजना : शीतल तळपदे
वेशभूषा : मंगल केंकरे
रंगभूषा : अभय मोहिते
सूत्रधार : श्रीकांत तटकरे
कलाकार : परी तेलंग, मधुरा देशपांडे, अलका परब, रमा सोहनी-रानडे, प्रियांका कासले, राजेश भोसले, अमर कुलकर्णी, सुशांत शेलार आणि आस्ताद काळे
दर्जा : **1/2



























































