
>> गीतेश शिंदे
‘रिवाइंड’ या कार्यक्रमातून दिवंगत कवी वा कवयित्रीच्या काव्य प्रवासावर प्रकाशझोत टाकला जातो. नारायण सुर्वेंच्या कविता फक्त दुःख मांडत नाहीत किंवा सामाजिक प्रवृतींच्या विरोधात गळे काढत नाहीत, तर त्या लढायला शिकवताना स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी प्रेरणादायी ठरतात.
कविवर्य नारायण सुर्वे यांना प्रथम ऐकलं महाविद्यालयात असताना. निमित्त होतं राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुर्वेंच्या हस्ते मिळण्याचं. त्याआधीच दहावीच्या पाठय़पुस्तकातील ‘कामगार आहे मी तळपती तलवार आहे’ या ओळीतून त्यांचा परिचय झालाच होता, पण प्रत्यक्ष या कवीला ऐकणं, पाहणं हा अनुभव विलक्षण होता. कारण हा कवी कवितेत जसा होता, अगदी तसाच जगण्यातही होता. म्हणूनच त्यांच्या कवितांविषयी विशेष ओढ वाटली.
पुढे स्वतःच्या कविता विविध मंचांवर सादर करताना नेहमीच पूर्वसुरींनी लिहिलेल्या आणि समकालीन कवींच्या कवितेची आठवण मनात असायचीच. मागच्या पिढीतील ज्येष्ठ-श्रेष्ठ कवींच्या कवितांची पुन्हा काव्य रसिकांसाठी उजळणी करावी हे प्रकर्षाने वाटायचे. या समविचारानेच नव्या दमाचे कवी पंकज दळवी आणि संकेत म्हात्रे यांच्यासोबत मिळून गेल्या वर्षी कोलाज संस्थेची स्थापना करून ‘क’ आणि ‘रिवाइंड – प्रवास कवितेचा’ हे दोन कार्यक्रम प्रस्तुत केले. त्यातील ‘क’ या कार्यक्रमाद्वारे समकालातील ज्येष्ठ कवी वा कवयित्रीच्या फारशा प्रसिद्ध नसलेल्या कविता त्यांच्या उपस्थितीत रसिकांसमोर सादर केल्या जातात. मुलाखतीतून त्यांचा कवितेचा व जीवन प्रवास तर उलगडला जातोच, आज सायंकाळी ५.३० वा. ठाण्यात सहयोग मंदिर येथे ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांचा काव्य प्रवास ‘क’मधून उलगडणार आहे. ‘रिवाइंड’ या कार्यक्रमातून दिवंगत कवी वा कवयित्रीच्या काव्य प्रवासावर प्रकाशझोत टाकला जातो.
‘रिवाइंड’मध्ये कोणत्या कवीचा काव्य प्रवास उलगडायचा याचा विचार सुरू असतानाच कामगार दिनाच्या औचित्याने ‘जाहीरनामा सुर्व्यांचा’ या कार्यक्रमाची संकल्पना तयार झाली. यानिमित्ताने समग्र सुर्वे प्रयोगाआधी वाचून काढले. सादरीकरणाच्या दृष्टीने व बदलत्या अभिरुचीच्या मागणीनुसार कविता निवडण्यात आल्या. अनाथ म्हणून सुर्वे जन्माला आले असले तरी गंगाराम सुर्वे या मिल मजदुराला रस्त्याच्या कडेला एक नवजात बाळ सापडलं. त्यास त्यांनी नाव दिलं नारायण. गंगाराम सुर्वे हे इंडिया वुलन मिलमध्ये स्पिनिंग खात्यात साचेवाले म्हणून काम करत तर आई काशीबाई कमला मिलमध्ये बाइंडिंग खात्यात होती. त्यामुळे अगदी लहानपणीच नारायण सुर्वेंचा स्पिनिंग, रोव्हिंग, भुळेर, संप, मोर्चे या सर्वांशी परिचय झाला आणि त्याचेच पडसाद पुढे त्यांच्या कवितेत उमटले. अनाथ असल्याने स्वतःची मूळ जात वा धर्म माहीत नसल्याने त्यांनी नेहेमीच माणूस ही एकच जात मानली. म्हणूनच ‘माझे विद्यापीठ’ या कवितेत ते असं लिहितात,
तर ‘सत्य’ या कवितेत सुर्वे ‘तुझे गरम ओठ ओठांवर टेकलेस तेव्हा’ असं जरी म्हणत असले तरी त्यात मध्यमवर्गीय समाजाचं रोमँटिसिझम नव्हतं. त्यांच्या कवितेतून येणारा शृंगार हा वास्तवाला भिडणारा व तितकाच दाहक असला तरी त्यातही खडीसाखरेचा गोडवा नक्कीच होता. हेच सुर्वे ‘विश्वास ठेव’ कवितेत असं लिहितात,
आयुष्य घृणेत सरणार नाही; हवीच तर घृणाही ठेव
ज्या खडकावर घुसळलीस मान
त्या माणसावर विश्वास ठेव
संप मोडण्यासाठी, चळवळीत फूट पाडण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा वापर झालाच नाही असे नाही, पण असं लाचारीचं आयुष्य पत्करून या बेइमान उजेडातही स्वतःची वात, अस्तित्व सुर्वेंना जपावंसं वाटलं. याबद्दल ‘विझता विझता स्वतःला’ या कवितेत ते लिहितात,
झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते अशी आमंत्रणे आम्हालाही आली, नाहीच असे नाही.
सुर्वेंच्या कविता फक्त कामगार चळवळीपुरताच मर्यादित नव्हत्या. त्यांच्या कविता कष्टकरी, शोषित वर्गाचा आवाज आहेत. तरीदेखील त्यावेळी साहित्य क्षेत्रात त्यांचं कम्युनिस्ट विचारसरणीचं असणं हा चर्चेचा विषय ठरला आणि त्यांच्या कवितांना समीक्षकांनी ‘कम्युनिस्ट’ हे लेबलही चिकटवलं. गिरगावी साहित्यापुढे गिरणगावचे साहित्य दाबण्याचा प्रयत्न झाला, परंतु ज्येष्ठ समीक्षक नरहर कुरुंदकर त्यांच्या बाजूने असं म्हणाले होते की, ‘‘माणूस म्हणून सुर्वे कम्युनिस्ट असतील, पण कवितेत जो कवी दिसतो त्याचा या तत्त्वज्ञानाशी काही अपरिहार्य संबंध नाही’’.
कारखान्यात मजुरी करणारे, पोस्टर डकवणारे, खांबावर चढून विजेच्या तारा जोडणारे, बिगारी नाक्यावर गोळा होणारे असे विविध प्रकारचे कष्टकरी या त्यांच्या वैशिष्टय़ांसह सुर्वेंच्या कवितेत भेटतात. याकूब नालबंदवाला, उस्मानचाचा शीगवाला, पोर्टर या कवितांतील तपशील, नोंदी, प्रसंग हे खरे वाटतात कारण हे अनुभव पुस्तकी नाहीत. तसेच सुर्वेंच्या कवितेत येणारी स्त्री सुखद अनुभव देणारी वस्तू, उदात्त देवता अशी न येता ती जीवन संघर्षातील सहकारी, जीवनातील एक आश्वासक शक्ती म्हणून येते. ते लिंगभेदाने स्त्रीकडे न पाहता माणूस म्हणूनच पाहतात. त्यामुळेच त्यांच्या कवितेतून भेटणारी चंद्रा नायकीण, ‘पाणी घे’ कवितेतील वेश्या, ‘मनीआडर’ कवितेतील कुटुंबवत्सल वेश्या, ‘तुमचंच नाव लिवा’ कवितेतील मुलाच्या शिक्षणासाठी मास्तरकडे अजीजी करणारी वेश्या, मार्क्सबद्दल सांगणारी जानकीअक्का यांसारख्या कितीतरी व्यक्तिरेखा आपल्या मनाचा ठाव घेतात त्या केवळ त्यांच्या लकबींमुळे नाहीत, तर त्यांच्या ठिकाणी असणाऱया मानवी भावभावनांमुळे.
नारायण सुर्वेंनीच म्हटल्याप्रमाणे, ‘‘मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही. मात्र मी नसेन तेव्हा या पृथ्वीवर एक नाव ठेवून जाईन’’.आज मराठी काव्यक्षेत्रात त्यांची कामगिरी पाहता नक्कीच आपल्या कवितेद्वारे त्यांनी आपले शब्द सार्थ केले आहेत. त्यामुळेच आजही त्यांच्या कविता ऐकण्यासाठी रसिक गर्दी करतात. या संकल्पनेस सार्वजनिक वाचनालय, कल्याणप्रमाणेच नारायण सुर्वे वाचनालय, नाशिक आणि मुंबई मराठी साहित्य संघाने उचलून धरले. ज्या वाचनालयाचे उद्घाटन खुद्द नारायण सुर्वेंच्या हस्ते झाले आहे. गेल्याच आठवडय़ात १६ जूनला मुंबई मराठी साहित्य संघात अक्षर साहित्यप्रमुख प्रा. सुहासिनी कीर्तिकर यांच्या नियोजनामुळे तिसरा प्रयोग एका नव्या संहितेसह केला. त्यामुळे नव्याने हा जाहीरनामा उलगडत होता. नारायण सुर्वेंच्या कविता फक्त दुःख मांडत नाहीत किंवा सामाजिक प्रवृतींच्या विरोधात गळे काढत नाहीत, तर त्या लढायला शिकवताना स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी प्रेरणादायी ठरतात.




























































