
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणीच्या पालम शहरात बुधवारी रात्री उशिरा दंगल उसळल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी शहरातील काही भागात समाजकंटकांकडून दगडफेक, हाणामारी आणि जाळपोळ करण्यात आली. या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून डीवायएसपी श्रीकृष्ण कर्डिले यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी पालम शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
बुधवारी सायंकाळी एका किरकोळ वादाचे पर्यवसन बाचाबाचीत झाले. त्यानंतर अचानकच दिसेल त्या वस्तूला आणि काही वाहनांना समाजकंटकांनी लक्ष्य केले आणि त्यातूनच हाणामारी दगडफेक आणि जाळपोळ प्रकारही घडल्याचे सांगण्यात आले.
मुख्य बाजारपेठेत हाणामारी सुरू झाल्यानंतर बाजारपेठ बंद करत असताना देखील समाजकंटकांनी वाहनांना टार्गेट करून नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही तर त्यांनी जाळपोळ सुरू केली. या प्रकारानंतर बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली त्यानंतर पोलीस घटनास्थळी धावले आणि त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला. परभणी येथूनही ही अधिक कुमक पालम येथे रवाना करण्यात आली आहे.
दरम्यान रात्री दहा वाजताच्या सुमारास या विभागाचे डीवायएसपी श्रीकृष्ण कर्डिले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सध्या पालम शहरात पोलीस बंदोबस्त अधिक तैनात करण्यात आला असून शांतता प्रस्थापित केली जात असल्याचे सांगितले. आजच्या या प्रकाराच्या संदर्भात सविस्तरपणे चौकशी केली जाईल. त्यापूर्वी पालम शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांची समजूत काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील पालम शहरात दाखल झाले असून परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच या घटनेचे अधिक पडसाद उमटू नयेत याची दक्षता देखील घेतली जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


























































