रस्ता – एक व्यक्तिमत्त्व लॉकडाऊनमधलं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमच्या माझ्यासारखाच
रस्ता क्वारंटाइन होता
तुमचं माझं माहीत नाही
पण तो एकदम फाइन होता…

गतवर्षी कोरोनामुळे एरव्ही कधीही न थांबणारी मुंबई स्तब्ध झाली. गर्दीने ओसंडून वाहणारे बाजार, गल्ल्या आणि दुकानं ठप्प झाली. उत्साहाने सळसळणारे रस्ते ओस पडले. लॉकडाऊनमधील सुनसान रस्त्याच्या त्या आठवणी आपल्या मनातून कधीच पुसल्या जाणार नाहीत. त्यावेळचं रस्त्यांवरचं चित्रणं विनय शिर्के यांनी आपल्या ‘रस्ता – एक व्यक्तिमत्त्व लॉकडाऊनमधलं’ या पुस्तकातून मांडलं आहे. त्यांनी जणू रस्त्यालाच बोलकं करतं लॉकडाऊनच्या काळात रस्त्याने जे पाहिलंय आणि अनुभवलंय ते फोटो आणि त्याला साजेशा कवितांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

गतवर्षी कोरोनापासून बचावासाठी सरकारने लॉकडाऊन केले होते. अशावेळी सरकारी नोकरीच्या निमित्ताने विनय शिर्के यांना बाहेर पडावे लागायचे. या काळात ऑफिसला जाण्यासाठी विविध वाहनांतून त्यांनी प्रवास केला. मात्र नेहमी गर्दीने गजबजलेल्या मुंबईच्या रस्त्यावरील शांततेने त्यांना अचंबित केले. पुस्तकाच्या कल्पनेबाबत ते सांगतात, ‘फोर्टमधील टाऊन हॉल, ओल्ड कस्टम हाऊस, सीएसएमटी स्टेशन, पालिका मुख्यालय येथे एरव्ही माणसांचा कलकलाट असायचा. लॉकडाऊनमध्ये मात्र येथे शांतता पसरली होती.

या शांततेत या इमारती जणू माझ्याशी बोलायच्या. दररोजच्या प्रवासात ‘रस्ता’ एक व्यक्तिमत्त्व बनून माझ्यासमोर आला. या निराशाजनक वातावरणात रस्त्याने माझ्यात सकारात्मकता निर्माण केली. त्याच्यात आणि माझ्यात संवाद होऊ लागला. आमच्या संवादाचे प्रतीक हे पुस्तक आहे. हा एक वेगळा प्रयत्न आहे जो तुमच्या मनात लॉकडाऊनच्या काळाची आठवण सदैव ताजी ठेवेल. या कठीण काळात सर्वस्वपणाला लावून लढणाऱया कोरोना योद्धांना हे पुस्तक मी समर्पित करतो.’

भद्रकाली प्रकाशनच्या या पुस्तकाची कल्पना दीपक कांबळी यांची असून सुलेखन प्रीती सागवेकर यांचे आहे. दीपक इंदप यांनी मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरची छायाचित्रे काढली आहेत. प्रतिक्रियांसाठी संपर्क – 9987193338