रस्त्यावर तुम्ही पाडलेले चर तुम्हीच बुजवा, नाहीतर दुप्पट पैसे भरा! पालिकेचा इतर प्राधिकरणांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमधील रस्त्यांवर चर मारून, खड्डे खणल्याने झालेली रस्त्यांची दुरवस्था सुधारा, अन्यथा दुप्पट रक्कम भरण्यासाठी तयार रहा, असा इशारा पालिकेने इतर प्राधिकरणांना दिला आहे. चर बुजवणे, छोट्या दुरुस्तींसाठीचा पालिकेचा 200 कोटींचा खर्च आता 618 कोटींवर गेला आहे. त्यामुळे पालिकेने आता इतर प्राधिकरणांना सक्त निर्देश देत त्यांनी रस्त्यावर केलेले खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई पालिकेच्या एरियात महानगर गॅस, टेलिकॉम कंपन्या आदीकडून केबलचे जाळे विस्तारण्यासाठी रस्त्यावर चर खोदण्यात येतात. हे चर बुजवणे, कामामुळे निर्माण झालेल्या छोट्या दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची असते. मात्र या प्राधिकरणांकडून ही जबाबदारी पार पाडली जात नाही. त्यामुळे पालिकेला आपले पैसे खर्च करावे लागत आहेत. नॅचरल गॅस, जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या, स्टॉर्म वॉटर ड्रेन आणि विद्युत केबल टाकण्यासाठी रस्त्यावर चर खोदण्यात येतात. शहरात पाइपलाइन किंवा केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले गेल्यानंतर चर भरणे आणि रस्ते दुरुस्तीचे काम पालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून केले जाते. यासाठी संबंधित संस्थांकडून पालिका शुल्क आकारते. मात्र संबंधित प्राधिकरणाकडून अनेक त्रुटी आढळल्याने प्रशासन आता धोरणात बदल करण्याच्या तयारीत आहे.  

प्रस्तावावर गदारोळ होणार

पालिकेच्या सात मंडळांमध्ये चर बुजविण्याचे कंत्राट 243.52 कोटी रुपयांवरून 583.02 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. म्हणजेच सुमारे 339.5 कोटी रुपयांची अतिरिक्त वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

करांसह या प्रकल्पाची सुधारित अंदाजित किंमत 618 कोटी रुपयांवर गेली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे. मात्र खर्च वाढीवरून या प्रस्तावावर मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.