
सामना ऑनलाईन । मुंबई
नोकरीच्या पहिल्याच दिवशी घरात अवघ्या दोन तासांत चोरी करून पळणाऱ्या मोलकरणीला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. विनीता गायकवाड असे तिचे नाव आहे. तक्रारदार या शिक्षिका असून त्या सांताक्रुझ परिसरात राहतात.
जानेवारी महिन्यात विनीता त्यांच्याकडे एक दिवस कामाला गेली होती. कामाच्या पहिल्याच दिवशी तिने पाच लाख तीन हजार रुपयांचा ऐवज चोरून पळ काढला होता. चोरीप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. वरिष्ठ निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुरेश वळवी यांचे पथक तपास करत होते. ती मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंडमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.



























































