दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला अटक, युनीट दोनची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्री उशिरा कामावरून सुटणार्‍या चाकरमान्यांना लुटून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पुण्यातील युनीट दोनने स्वारगेट परिसरात जेरबंद केले. त्यांच्याकडून मिरची पावडर, लोखंडी रॉड, दुचाकी, मोबाइल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अक्षय किशोर शिंदे (वय 28, रा. केशवनगर), सतीश दशरथ साळुंखे (वय 50 रा. रासकर मळा), अनिल शंकर जाधव (वय 40) संदीप बाबूलाल कोरी (वय 27, रा. पर्वती दर्शन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार योगेश माने (वय 40) हा फरार आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई कादिर शेख यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गुन्हे शाखेचे युनीट दोन पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी स्वारगेट परिसरात चाकरमान्यांना लुटण्याच्या तयारीत काहीजण असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांच्या एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, गजानन सोनुने, उज्ज्वल मोकाशी, मोहसीन शेख, प्रमोद कोकणे, शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, नागनाथ राख, कादीर शेख यांनी केली.