
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काही काळासाठी स्थगित केलेली आहे. मागील तीन दिवसांपासून रोहित पवार यांनी पुणे जिह्यातील हवेली शिरूर तालुक्यातून युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती.
आज संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे जाहीर केले. गावबंदीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवता आहात का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, गावबंदीच्या निर्णयावर हा निर्णय घेतला नाही, आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे. या यात्रेदरम्यान एका गावात मी स्वतः सर्वांना भेटलो, तेव्हा आम्ही मराठा आरक्षणावर ठाम असल्याचे सांगितले. तेव्हा सर्वजण आमच्याबरोबर काही अंतर चालले. मी गावबंदीमुळे अजिबात स्थगिती केली नाही, तर ज्यांच्यासाठी ही यात्रा काढली, ते युवा अस्वस्थ असताना ही यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही. राज्यातील युवक आज आत्महत्या करत असतील आणि राज्यातील वातावरण अस्वस्थ असेल आणि त्या राज्यसभा संवेदनशील असेल, तर अशा परिस्थितीत यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही.



























































