
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत गतविजेता मुंबई इंडियन्सच्या संघाने प्ले ऑफमध्ये झोकात प्रवेश केला आहे. 13 लढतीत मुंबई इंडियन्सचे 18 गुण झाले आहेत. मुंबईचा संघ सध्या टॉपला असून आता त्यांना तिथून हटवणे कोणत्याही संघाला शक्य नाही.
मुंबई प्ले ऑफमध्ये पोहोचली असली तरी संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना वेगळीच चिंता भेडसावत आहे. मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त आहे. गेल्या 4 लढतीत तो एकदाही मैदानात उतरलेला नाही.
पंजाबविरुद्ध खेळताना झाली दुखापत
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध अत्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली होती. स्नायूंना दुखापत झाल्याने तो गेल्या 4 लढतीत खेळलेला नाही. या चार लढतीत वेस्ट इंडिजचा खेळाडू किरोन पोलार्ड याने मुंबईची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
रोहितच्या अनुपस्थितीत 4 लढतीत 3 विजय
रोहितच्या जागी कर्णधार पदाचा भार सांभाळणाऱ्या पोलार्डने मुंबईला 4 लढतीत 3 विजय मिळवून दिले आहेत. चेन्नई सुपर किंग्जला 10 विकेट्सने पराभूत केल्यानंतर मुंबईला राजस्थानकडून 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर मुंबईने बंगळुरूला 5 विकेट्स आणि दिल्लीला 9 विकेट्सने पराभूत करत प्ले ऑफचे तिकीट मिळवले.
पोलार्डने आतापर्यंत 17 लढतीत (वेगवेगळ्या सिझनमध्ये) मुंबईचे कर्णधार पद भूषवले आहे. यात त्याने 16 लढतीत विजय मिळवून दिला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माची निवड करण्यात आलेली नाही. टीम घोषित झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने रोहितचा सराव करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. मात्र तो एकदाही मैदानात उतरला नाही. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना।दिसणार की नाही? असा सवाल उपस्थित होतोय.
प्ले ऑफमध्ये उतरणार?
दरम्यान, मुंबईचा आता लीग स्टेजमधील एकच सामना बाकी आहे. यात मुंबईला 3 नोव्हेंबरला सनरायझर्स हैद्राबादशी भिडायचे आहे. मात्र या लढतीच्या निकालाने मुंबईच्या गुणतालिकेतील स्थानावर परिणाम होणार नाही. त्यामुळे रोहित प्ले ऑफच्या लढतीत मैदानात उतरण्याची शक्यता आहे.



























































