रोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन!

rokhthokपुण्यातील एका महिलेने चंद्रावरील जमीन खरेदीत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. अशा प्रकरणात पोलीस काय करणार? ज्यांनी चंद्रावर जमिनी खरेदी केल्या त्या भाबड्या माणसांनीच 2014 साली मोदींना मतदान केले. फसवणूक चंद्रावर आणि जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी झाली!

पुणेकर महिलेने चंद्रावर जमीन खरेदी केली. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे तिला पंधरा वर्षांनंतर समजले. जमीन खरेदी व्यवहारात फसवणुकीचे प्रकार नेहमीच होत असतात, पण चंद्रावर जमीन खरेदीची कल्पना पंजाबच्या लुनार फेडरेशन कंपनीने मांडली. लोकांनी त्यात गुंतवणूक केली. राधिका दाते-वाईकर असे या पुणेकर महिलेचे नाव. 50 हजार रुपये एकर या भावाने तिने जमिनीचे बुकिंग केले आणि चंद्रावरून खाली विमान येईल व आपण आपल्या जमिनीवर पोहोचू या कल्पनेत ती तरंगत राहिली. आता हे सर्व खोटे होते व फसवणूक झाली असे तिला वाटले. चंद्रावर जमिनीचे तुकडे पाडून विकणारे तर बोफोर्स आणि राफेल करारवाल्यांचे बाप निघाले. पुण्यातल्या महिलेने चंद्रावर जमिनीचे बुकिंग केले, या बातमीपेक्षा तिची फसवणूक झाली ही बातमी महत्त्वाची. पुण्यात शहाणपण नेहमी उकळलेल्या दुधाप्रमाणे उतू जात असते. राधिका दाते-वाईकर या महिलेची फसवणूक झाली. अर्थात चंद्रावर जमिनीचे बुकिंग करणाऱया राधिका दाते-वाईकर एकट्या नाहीत. आपल्या देशातील अनेक सेलिब्रिटीजनी असे व्यवहार केल्याचे सांगितले जाते. अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानेदेखील मध्यंतरी एका मुलाखतीत चंद्रावर जमिनीचे बुकिंग केल्याचा खुलासा केला होता. आता राधिका यांच्याप्रमाणे सुशांत सिंग याचीही भावना फसवणूक झाल्याची आहे किंवा नाही हे त्याचे त्यालाच माहीत, पण अशी फसवणूक आपल्या अवतीभवती रोजच होत असते. मात्र चंद्रावरच्या जमिनीत फसवणूक झाली हा मूर्खपणा म्हणावा की गौरव?

भाबडा माणूस
चंद्रावर पन्नास हजार एकरांत जमीन घेणारा मोठा वर्ग देशात आहे. तो भाबडा आहे व याच वर्गाने नरेंद्र मोदी यांना मतदान करून भाजपला सत्तेवर आणले. आकाशातून चंद्र, तारे तोडून आणण्याचे वचन मोदी यांनी दिले. प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकू असे मोदी यांनी सांगितले. लोकांना खरे वाटले. त्यामुळे मोठे मतदान त्यांना झाले. हे सर्व चंद्रावर जमीन खरेदीसारखेच आहे. जनतेच्या खात्यात पंधरा लाख जमा झाले नाहीत व राधिका वाईकरला चंद्रावर जमीन मिळाली नाही. काही वर्षांपूर्वी मि. नटवरलालने हिंदुस्थानात धुमाकूळ घातला होता. त्याने बनावट कागदपत्रे तयार करून दिल्लीचे कुतूब मिनार, इंडिया गेट व आग्र्याचा ताजमहाल विकला. विकत घेणाऱयांना कळले नाही आपण नेमका काय व्यवहार करीत आहोत. ताजमहाल विकत घेणारे व चंद्रावर पन्नास हजारांत एकर जमीन घेणारे एकाच माळेचे मणी. फसवणूक झाल्यावर सगळे पोलीस, सरकार व राजकारण्यांच्या नावाने बोंबा मारतात, पण चंद्रावर जमीन खरेदी करताना शहाणपण नक्की जाते कोठे?

विज्ञानाची झेप
माणूस चंद्रावर जाऊन आला. तेथे हवा नाही. पाणी नाही. निसर्ग नाही. फक्त खड्डेच खड्डे. गवताचे पातेही तेथे उगवणार नाही. तरी विज्ञानाची झेप म्हणून माणूस अंतराळात चंद्रावर जाऊन आला. मात्र जमिनीवरचा दुष्काळ संपला नाही. महापुरास बांध घालता आला नाही. मात्र पुढील पंचवीस वर्षांत ‘चंद्रावर’ पर्यटन सुरू होईल व त्याचे बुकिंग अमेरिकेत आताच सुरू झाले आहे. ही फसवाफसवी चिरंतन आहे. जन्मतःच हनुमान सूर्याचे चुंबन घ्यायला झेपावला व त्याचे तोंड भाजले अशी कथा रामायणात आहे आणि श्रद्धाळू ते मान्य करतात. 1984 साली हिंदुस्थानचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा ‘सोयूझ’मधून अंतराळात गेला. रॉकेट पृथ्वीवरून अवकाशात तुफान वेगाने सोडले जाते. ते पृथ्वीच्या कक्षा भेदून अंतराळात जाते तेव्हा माणूस अचेतन अवस्थेत जातो. जवळजवळ बेशुद्धच असतो. वजनरहित अवस्थेमुळे आपले अवयवही आपल्या ताब्यात नसतात. त्या वेळी पृथ्वीवरून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उपग्रहामार्फत राकेश शर्माशी संभाषण केले. ‘‘तुमची प्रकृती कशी आहे, तुमचे रशियन सहकारी कसे आहेत, तुम्ही परत येण्याची आम्ही वाट पाहत आहोत’’ वगैरे औपचारिक गप्पा झाल्यावर इंदिरा गांधींनी राकेश शर्मांना सहज विचारले की, ‘तुम्हाला तुमच्या प्रयोगशाळेतून भारत कसा दिसतो?’ राकेश शर्मा बहुधा या परीक्षेची तयारी करूनच अंतराळात गेले असावेत. त्यांनी उर्दूचे प्रसिद्ध शायर इकबाल यांच्या कवितेची ओळच ऐकवली. ते म्हणाले, ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा!’ इंदिराजी खूश झाल्या. अंतराळातून राकेश शर्मा यांना हिंदुस्थान दिसला. पुण्याच्या राधिका यांना चंद्रावरची एक एकर जमीन दिसली. हा शहाण्या माणसाचा व्यवहार नाही. खरं तर बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर हा मराठी माणसाचा बाणा, पण ‘चंद्रावरची जमीन दाखव, नाहीतर चालता हो’ असे राधिका यांनी त्या पंजाबी कंपनीस सांगितले नाही. एक पाय घट्ट रोवून मगच दुसरा उचलावा असे एक सुभाषित सांगते. शहाण्या माणसाचा व्यवहार हा आहे. तो एक पाय उचलून टाकतो त्या वेळी त्याचा दुसरा पाय जमिनीवर घट्ट ठेवलेला असतो. मात्र उतावीळ माणसे घाईघाईने निर्णय घेतात. त्यांचे व्यवहार चुकतात. उचललेले पाऊल नीट स्थिर जागी पडले आहे की नाही, हे पाहिल्याशिवाय पुढचे पाऊल टाकले तर पायाखालचा दगड गडगडतो नि माणसाला तोल सावरणे कठीण जाते. शेकडो उपग्रह आज अवकाशात आपापल्या देशांचे झेंडे फडकवीत फिरत आहेत. चंद्रावर माणूस पाठवला, अन्य ग्रहांवरही तो गेला. तेव्हा जगाने आनंद व्यक्त करायला हवा होता. तसे होत नाही. चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी अमेरिका आणि रशिया या राष्ट्रांचे ध्वज तेथे लावले. म्हणजे तेथेही ‘चंद्रावर’ पाऊल ठेवणारा पहिला ‘माणूस’ यापेक्षा त्यांचे ‘अमेरिकन’ किंवा ‘रशियन’ असणे अधिक महत्त्वाचे ठरले. थोडक्यात चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारी ही पृथ्वीवरची माणसे नव्हती तर ते अमेरिकन अथवा रशियन होते.

चीनची झेप
आता चीनने एक नवेच पाऊल चंद्रावर टाकले. चीनने चंद्रावर कापूस पिकवण्यात यश मिळवले व आता बटाटय़ाची शेती चंद्रावर करण्याच्या तयारीत हे लोक आहेत. चीनला अंतराळातील महासत्ता व्हायचे आहे. अमेरिका, रशियाने चंद्रावर माणूस पाठवला. चीनने विज्ञान पाठवून ‘जमीन’ सुपीक असल्याचे दाखवले. हवा, पाणी, माती असलेला 18 सेंटीमीटरचा डबा त्यांनी यानातून पाठवला व चंद्राच्या पृष्ठभागावर रोपटे उगवून दाखवले. उद्या चंद्रावर दावा सांगायला चीन मागेपुढे पाहणार नाही. कारण कसेल त्याची जमीन हा नियम तेथेही लागू पडेल. नुसते पाय ठेवून काय होणार? चीनने जमिनीवर जीवसृष्टी निर्माण केली! आपल्या पुराणकथांत नचिकेताची गोष्ट सांगतात. नचिकेत मृत्यूचा माग काढीत स्वर्गात गेला व मृत्यूचे रहस्य काय ते शोधू लागला. सध्याचा आधुनिक नचिकेत स्वर्गात जाऊन मृत्यूचा शोध केव्हाच विसरला असता. तेथील अप्सरा, मेनका, रंभा, भोग, उपभोगांनी त्याचे जीवन व्यापून टाकले असते. आपलेही अंतराळवीर ‘वर’ पोहोचले तेव्हा अशी जाहिरात केली की, हे वीर पृथ्वीच्या कक्षा भेदून अवकाशात शिरले तेव्हा त्यांनी ज्या दारूचा घोट घेतला ती दारू अमूक एक कंपनीची होती. म्हणजे दिग्विजय त्या दारू कंपनीचा होता. त्या दारू कंपनीला व्यवहार समजला, पण चंद्रावर जमीन घेणाऱया पुण्याच्या राधिका दाते-वाईकर यांना समजला नाही!

ट्विटर- @rautsanjay61
जीमेल – rautsanjay61@gmail.com