
महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचा ‘सीझन-2’ येणार काय? यावर चर्चा सुरू आहेत. शिंदे गटाचे 16 आमदार बाद होतील. त्याची भरपाई म्हणून राष्ट्रवादीचे आमदार फोडले जातील. अजित पवारांपासून हसन मुश्रीफांपर्यंत ‘ईडी’चा ससेमिरा लावला गेला आहे. त्याचा शेवट काय होणार?
‘बिग बॉस’, ‘कौन बनेगा करोडपती’ अशा कार्यक्रमांचे ‘सीझन- 1’, ‘सीझन- 2’ असे टीव्हीवर सुरूच असतात. तसे सीझन आता महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीबाबत सुरू आहेत. शिवसेना फोडली हा ‘सीझन-1’, आता राष्ट्रवादी फोडण्याचा ‘सीझन-2’ आला आहे, अशी चर्चा जोरात आहे. फोडाफोडी म्हणजेच लोकशाही हे आता काही लोकांनी ठरवूनच टाकले आहे. हिंदुस्थानी लोकशाहीची कशी धूळधाण उडवली जात आहे ते आता रोजच दिसते. कालपर्यंत लोकांची मते विकत घेतली जात होती. आता लोकांनी मते देऊन निवडून दिलेल्या आमदार-खासदारांना सहज विकत घेण्यास आजचे सत्ताधारी उतरले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अंजली दमानिया यांनी समाजमाध्यमांवर एक माहिती बुधवारी प्रसिद्ध केली. त्या सांगतात, ”आज मंत्रालयात कामानिमित्ताने गेले. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटाचे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या 15 आमदारांसह लगेच भाजपबरोबर जाणार आहेत. बघू, आणखी किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची!” श्रीमती दमानिया या मंत्रालयात गेल्या व त्यांना ही गुप्त माहिती मिळाली ही रंजक बाब आहे. जी बातमी महाराष्ट्र आणि देशाला बऱ्याच दिवसांपासून माहिती आहे, फक्त ही ‘फेक न्यूज’ आहे की आणखी काही हे सत्य कसे शोधायचे? भाऊबंदकी हा मानवजातीला दिलेला शाप असेल, परंतु सत्तेसाठी माणसे कोणत्या थराला जातात याचे अनेक धडे इतिहासात आणि वर्तमानातही आपण पाहत असतो. महाराष्ट्राला व मराठ्यांना दुहीचा शाप आहे व ती दुही घरातूनच सुरू होते. शिवछत्रपतींनी शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अतुल परामाने सबंध देशात दरारा निर्माण केला. त्यांचे चिरंजीव संभाजीराजे हेदेखील पराक्रमी होते, शूरवीर होते. एका विशिष्ट परिस्थितीत दुर्दैवाने ते मोगलांना मिळाले, मात्र त्याच संभाजीराजांनी शेवटी स्वराज्य व धर्म यासाठी बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान आजही प्रेरणादायीच आहे.
एकच चर्चा
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे अयोध्येत गेलेले शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा श्री. अजित पवार यांनीच करायला हवा. ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात श्री. पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही. मग जरंडेश्वर खरेदीच्या व्यवहारातील मनी लॉण्डरिंगच्या आरोपांचे काय झाले? की ते सर्व आरोप आणि धाडी राजकीय दबावासाठीच होत्या? असे दहशत व दबावाचे राजकारण महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते. बाबा आमटे हयात असताना एक ज्येष्ठ पत्रकार त्यांना भेटायला गेले. त्यांच्यात गप्पा झाल्या. ”देशाचा एकही प्रश्न सुटतो असे वाटत नाही…” असे ते पत्रकार म्हणाले. त्यावर बाबांनी उत्तर दिले, ”कसे वाटेल? राजकीय पक्ष कोणतेच प्रश्न सोडवत तर नाहीत, उलट तेच नवनवे प्रश्न निर्माण करीत आहेत.” आज महाराष्ट्रात व देशात तेच सुरू आहे. सत्तेवर आज कोण आहेत? जे असायला हवेत ते नाहीत. प्रश्न वाढवायचे काम करणाऱ्यांना ते सोडवा असे सांगायचे?
राष्ट्रवादीचे कोण?
शिवसेनेचे 40 आमदार फोडून भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. हे अनैतिक आहे. त्यातले 16 जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अपात्र ठरतील म्हणून सत्ता वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तेवढेच आमदार ईडी, सीबीआयच्या मदतीने फोडायचे असे कारस्थान चालले आहे. ते 16 कोण? ज्यांच्यावर या ना त्या कारणाने खटले आहेत त्यांना धमकवायचे. श्री. हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबावर भाजपने हल्ले सुरू केले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहाराचे हे प्रकरण. मुश्रीफ यांनी जेरीस येऊन भाजपात जावे असा एकंदरीत खटाटोप आहे. मुश्रीफ हे श्री. शरद पवार यांचे विश्वासू, पण तुरुंगात कोणालाच जायचे नाही. श्री. एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगात जायचे नव्हते. म्हणून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. ते सरळ बेइमानांचे सरदार झाले. मंगळवारी संध्याकाळी श्री. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले. ईडीच्या दहशतीने लोकांना फोडणे हे सभ्य लोकांचे राजकारण नाही. राजकारणात राहून लोकांनी अमाप संपत्ती कमावली. ती टिकविण्यासाठी त्यांना सत्तेची कवचकुंडले हवीच असतात. घाऊक पक्षांतरे त्यातून होतात. श्री. पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला, ”आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीत!” शिंद्यांबरोबर गेलेल्या 11 आमदार व 6 खासदारांच्या फायली सध्या टेबलावरून कपाटात गेल्या आहेत. शिंदे गटाप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अशा किती फायली कपाटात जातील ते पाहायचे. आज राज्याचे चित्र काय आहे? शिंदे सरकारचे मंत्री मंत्रालयात जात नाहीत. देवेंद्र फडणवीस ‘सागर’ बंगल्यावरून काम करतात. शिंदे यांच्या ताब्यात ‘वर्षा’सह तीन सरकारी बंगले आहेत. शिंदे यांचे चिरंजीव प्रशासनात सरळ हुल्लडबाजी करतात. त्यामुळे मंत्रालयापासून सर्वत्र अस्वस्थता आहे. सरकार कोठे चालले आहे? ते मंत्रालयातच झोपले आहे.
श्रीमंत कसे होतात?
सत्तेवर येताच माणसे ’श्रीमंत’ होतात. श्रीमंत राजकारण्यांचे ’पीए’ सगळ्यात मोठे व्यवहार करतात. स्वत:ची विमाने व हॅलिकॉप्टर घेऊन फिरणारे राजकारणी आज महाराष्ट्रात आहेत. अनेक मंत्र्यांच्या फार्महाऊसवर आज ’हेलिपॅड्स’ आहेत. या सगळ्यांचे उत्पन्न काय? सार्वजनिक जीवन स्वच्छ करण्याच्या गोष्टी फक्त होतात. प्रत्यक्षात काहीच घडत नाही. अदानी प्रकरणाशी पंतप्रधान मोदींचे थेट नाव जोडले. ते त्यावर बोलत नाहीत. कॅनडात एक मंत्री कुणासाठी तरी पोलीस ठाण्यात गेला तर त्याला राजीनामा द्यावा लागला. पोलिसांच्या कारभारात त्याने हस्तक्षेप केला, असे मानले गेले. जपानमध्ये एक मंत्री सरकारी गाडीतून दौऱ्यावर गेला, परंतु रविवार येताच तीच गाडी घेऊन पिकनिकला गेला म्हणून त्यास राजीनामा द्यावा लागला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना एका पॉर्नस्टारला मिटवामिटवीसाठी पैसे दिले म्हणून अटक झाली. अमेरिका व जपानमध्ये वैयक्तिक जीवनातील अनैतिक प्रकरण बाहेर येताच कुणी सत्तेवर राहू शकत नाही. तेथे वृत्तपत्रेच हे काम प्रामुख्याने करतात, परंतु ते विरोधी पक्षाचे काम करतात असे तेथे कुणी म्हणत नाही. आपल्याकडे सत्ताधाऱ्यांनी वृत्तपत्रांनाच ताब्यात घेतले. केंद्रीय तपास यंत्रणांचे आधीच खासगीकरण झाले. कुणी काही अनैतिक काम केले तर आता घाबरायचे कारण नाही. त्यांनी सरळ पक्षांतर करायचे व सत्ताधाऱ्यांच्या पक्षात सामील व्हायचे!
लोकशाहीची धूळधाण उघडपणे सुरू आहे!
Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]