
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात रासपचे नेते महादेव जानकार यांनी स्टेजवरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ‘दादा, मी भाजपचा नाही मी माझ्याच रासप पक्षाचाच आहे’, अशा शब्दात सुनावलं. आपल्या भाषणातून त्यांनी भाजप मित्रपक्षाला आणि पक्षातील नेत्यांना कशा प्रकारची वाणगूक देत आहे, हे चव्हाट्यावर आणले. ‘दादा मी एनडीएचा घटकपक्ष आहे. तुमच्यासोबतच राहणार आहे. फक्त इथून पुढे अशी वागणूक आम्हाला देऊ नका’, असा इशारा देखील जानकर यांनी दिला.
‘मी एनडीएचा घटकपक्ष आहे, पण दादा तुम्ही कितीही आम्हाला त्रास दिला तरी आम्ही तुमच्या बरोबरच राहू. हे विसरू नका, आमची नियत साफ आहे. तुम्ही त्रास देतात हे मान्य करावं लागेल, असा सणसणीत टोला देखील त्यांनी लगावला. आम्ही जोडलो ते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे एनडीएला जोडलं गेलो. आणि पुन्हा तुम्हाला सत्तेत आम्हीच आणू. आमच्या मनात खोट, पाप नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं.
गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीला उजाळा देतानाच त्यांनी भाजपला चिमटे काढण्याची एकही संधी सोडली नाही. ‘आपला नेता जर मोठा व्हायचा असेल आणि गोपीनाथ मुंडे जयंतीच्या निमित्ताने पंकजा ताईंना पाठिंबा द्यायला आलेल्या लोकांचं स्वागत केलं पाहिजे. हाच आपला संस्कार आहे’, असं महादेव जानकर जनसमूदायाला उद्देशून म्हणाले. यातून तिथे जमलेल्या लोकांच्या मनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविषयी मनात काय भावना आहेत, ते सूचक शब्दात सांगितले.
‘भाजपने मुंडे साहेबांना दिल्लीपर्यंत नेलं. त्या पक्षाच्या नेत्याचा अपमान हा आपल्या पंकजा मुंडे यांचा अपमान आहे’, असंही जानकर म्हणाले.
‘हार जित होत असते, पण त्यानं घाबरून जायचं कारण नाही. पक्ष त्याची दखल घेत असतो. पण आपल्या नेत्याच्या पाठी आपण खंबीर उभं राहायचं असतं. हे परळीकरांनो लक्षात ठेवा’, असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे रहा असा सल्लाच परळीकरांना दिला.
‘माझी विनंती आहे की ताई सक्षम आहेत. त्या निर्णय घेतील पण आपण डिवचण्याच्या भूमिकेत राहू नका’, असं ही ते म्हणाले.
‘दुसऱ्याच्या घरी जाऊन आपण मोठं होणार नाही. तेव्हा शिव्या दिल्या, मारलं तरी यांच्यासोबतच आपल्याला जावं लागेल’, असंही ते म्हणाले.

























































