सरसंघचालकांनी घेतली मिथुन चक्रवर्ती यांची भेट, चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकांमुळे पश्चिम बंगाल सध्या चर्चेत आहे. निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि तृणमूल काँग्रेस दोघांनीही जोर लावला आहे. भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री अशी फौज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाताना दिसत आहेत. तर तृणमूलकडून ममता बॅनर्जी हाच मुख्य चेहरा आहे. या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे. मुंबईत ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मंगळवारी सकाळी खुद्द मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील घरी दाखल झाले. सकाळी या दोघांची भेट झाली.

मिथुन यांनी नागपुरात जाऊन जेव्हा मोहन भागवत यांची भेट घेतली होती, तेव्हा त्यांना मुंबईत आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. आता बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी भाजप चेहरा शोधत असल्याचं बोललं जात आहे. अशात आरएसएसच्या सरसंघचालकांनी मिथुन यांची भेट घेतल्यानं चर्चा सुरू झाल्या आहेत. अर्थात अजूनही या सर्व शक्यताच असल्याचं आजतक या हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळानं म्हटलं आहे.

बंगालमध्ये जन्मलेले मिथुन दा यांच्या प्रोफाइलमध्ये डिस्को डांसर ते सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय नेता असा विविध प्रकारचा अनुभव पाहायला मिळतो. ते राज्यसभेत खासदारही होते. महत्त्वाचं म्हणजे तृणमूल काँग्रेसकडूनच त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. तृणमूलमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोन वर्षे खासदार राहिलेल्या मिथुन यांनी नंतर पदाचा राजीनामा दिला होता.

आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचं वातावरण तापलं आहे. भाजप आपल्या पक्षाला स्थानिक चेहरा देण्यासाठी शोध घेत आहे, त्या दरम्यान मिथुन आणि सरसंघचालकांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. आतापर्यंत बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याच्या नावाची चर्चा होती, मात्र त्याची तब्येत काही दिवसांपूर्वी ठीक नसल्यानं त्यांचं नाव आता चर्चेतून बाजूला पडलं आहे.