
कुत्र्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्याच्या नादात डिलिव्हरी बॉय तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना हैदराबाद येथील मणिकोंडा येथे रविवारी रात्री घडली.याप्रकरणी पोलिसांनी ऑर्डर देणाऱ्या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
30 वर्षीय मोहम्मद इलियास हा अमेझॉन कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. रविवारी रात्री तो मणिकोंडा येथील पंचवटी अपार्टमेंट येथे सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी ग्राहकाच्या घराचा दरवाजा अर्धा उघडा होता. घरातून बाहेर आलेल्या पाळीव कुत्र्याने डिलिव्हरी बॉयवर भुंकण्यास सुरुवात केली आणि त्याचा पाठलाग केला. कुत्र्याच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी इलियास धावता धावता रेलिंगवर चढला आणि तिथून पाय घसरून तो खाली पडला. त्यानंतर ग्राहकाने इतर लोकांच्या मदतीने डिलिव्हरी बॉयला रुग्णालयात दाखल केले. या घटनेत इलियास गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर आहे.




























































