
रशियाने पुन्हा उत्तर कोरियाला कोरोना लस देण्याची तयारी दर्शवत मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तर कोरियामध्ये कोरोना आणि अन्नटंचाईचे दुहेरी संकट आलं आहे. अशावेळी रशिया, चीन अगदी दक्षिण कोरियानेही मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु उत्तर कोरियाने कुणाचीही मदत घेण्याचे नाकारले आहे. त्यामुळे तेथील संकट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संपूर्ण जगासह उत्तर कोरियामध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु किम जोंग उनने तिथे लसीकरणाऐवजी कडक लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारला आहे. लॉकडाऊन इतका कडक आहे की उत्तर कोरियाने शेजारील राष्ट्रांशीही संबंध तोडून टाकले आहेत. या देशाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. उत्तर कोरिया हा अन्न, इंधन आणि खतांसाठी चीनवर अवलंबून आहे. कोरोनामुळे इतर राष्ट्रांशी व्यापार बंद केल्याने या तीनही गोष्टींची अभूतपूर्व टंचाई तिथे निर्माण झाली आहे. देशात अन्नटंचाई असल्याची बाब ही खुद्द किम जोंग उनने मान्य केली आहे. तसेच 90 च्या दशात ज्या प्रमाणे अन्न टंचाई होती त्यापेक्षाही हे मोठे संकट असून त्यासाठी तयार राहिले पाहिजे असे आदेश किमने दिलेत.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामुळे फार काही साध्य होणार नाही असे रशियाने यापूर्वी उत्तर कोरियाला बजावले होते. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव म्हणाले की आम्ही उत्तर कोरियाला अनेक वेळेला कोरोना प्रतिबंधक लसीसाठी मदत देऊ केली होती. उत्तर कोरियाला जेवढ्या लसींची गरज आहे तेवढ्या लसी रशियाकडून पुरवल्या जातील असा शब्दही रशियाने दिला होता. मात्र उत्तर कोरियाने सातत्याने ही मदत नाकारली आणि स्वतःच या संकटाचा सामना करण्याचे ठरवले आहे.
किम जोंग उन याने त्याच्या देशातील कोरोना संकटाचे खापर लष्करी अधिकारी री प्योंग चोलवर फोडले होते. किम जोंग उन या अधिकाऱ्यावर भडकला असून त्याने या अधिकाऱ्याला धारेवर धरल्याचेही बोलले जाते. उत्तर कोरियातील हे संकट आगामी काळात आणखी गहिरं होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार यंदा उत्तर कोरियाला 8 लाख 60 हजार टन अन्नधान्याची टंचाई भासेल. टंचाईमुळे काही समस्या निर्माण होऊ नये म्हणून किम जोंग उन याने अन्नधान्याचे वाटप आत सैन्याकडे सोपवले असल्याचंही सांगितलं जात आहे.
या संकटावर मात करण्यासाठी उत्तर कोरियाला युद्धपातळीवर मोठ्या प्रमाणात अन्नधान्याच्या उत्पादनाची सुरुवात करावी लागेल. गेल्या वर्षी उत्तर कोरियामध्ये नैसर्गिक संकटे आली होती, त्याचा परिणाम शेतीवर झाला होता. अन्नटंचाईचं संकट तीव्र होण्यामागे हे देखील एक कारण आहे.
रशियाने उत्तर कोरियाला या संकटातून बाहेर येण्याचे अनेक पर्याय सुचवले आहेत. त्यात लसीकरण, शेजारील राष्ट्रांशी व्यापार उदीम आणि सीमेवरील निर्बंध उठवणे अशा पर्यायांचा समावेश आहे. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव यांनी किम जोंग उन यांच्या अनेक जवळच्या अधिकार्यांशी यावर चर्चा केली. परंतु इतर देशांची मदत घेतल्यास त्यांचा उत्तर कोरियामध्ये हस्तक्षेप वाढेल, देशात लस साठवण्याची पुरेशी यंत्रणा नाही ही बाब जगासमोर येईल म्हणून उत्तर कोरिया सातत्याने मदत नाकारत असेल असा अंदाज रशियाने व्यक्त केला आहे.



























































