6, 6, 6, 6, 6nb, 6, 6… ऋतुराज गायकवाडचा ‘विश्वविक्रम’, एकाच षटकात ठोकले 7 षटकार

ruturaj-gaikwad

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश संघात उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू आहे. या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने तुफानी खेळी करत विश्वविक्रमाला गवसणी घातली. उत्तर प्रदेशचा गोलंदाज शिवा सिंह याला एकाच षटकात 7 षटकार ठोकण्याचा कारनामा ऋतुराज याने केला.

उत्तर प्रदेशचा कर्णधार यश शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम महाराष्ट्राला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. सलामीवीर राहुल त्रिपाठी आणि त्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आलेला सत्यजित बच्छाव बाद झाला. 41 धावांवर दोन फलंदाज गमावल्यानंतर ऋतुराज गायकवाड याने डावाची सूत्र आपल्या हाती घेतली. तिसऱ्या विकेटसाठी त्याने अंकित बावणे सोबत अर्धशतकीय भागीदारी केली. बावणे 37 धावा काढून बाद झाला.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या अझीम काझी याने गायकवाडला उत्तम साथ दिली. दोघात शतकीय भागीदारी झाली. या दरम्यान ऋतुराजने आधी शतक, दिडशतक आणि मग द्विशतक ठोकले. गायकवाड अखेर पर्यंत नाबाद राहिला. त्याने 159 चेंडूत नाबाद 220 धावा चोपल्या. यात त्याच्या 10 चौकारांचा आणि 16 गगनचुंबी षटकारांचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सलग 7 षटकार

महाराष्ट्राच्या डावातील 49व्या षटकात ऋतुराज गायकवाड याने तांडव केले. यूपीचा गोलंदाज शिवा सिंह याच्या एका षटकात त्याने 7 षटकारांच्या मदतीने 42 धावा काढल्या. पहिल्या 4 चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर पाचवा चेंडू शिवा सिंह याने नो बॉल टाकल्या. या चेंडूवरही गायकवाड याने षटकार ठोकला. त्यानंतर पुढचे दोन्ही चेंडू सीमापार पाठवत विश्वविक्रमाची नोंद केली.