सामना अग्रलेख – कोरोनावरील अंतिम विजय; खबरदारीची गुढी उभारूया!

कोरोनाशी संपूर्ण जगच लढत आहे. हिंदुस्थान आणि महाराष्ट्रही लढत आहे. सरकार, प्रशासकीय यंत्रणा, जनता सगळेच या संकटाला आपापल्या परीने तोंड देत आहेत. सरकारचे प्रयत्न आणि जनतेची खबरदारीया जोरावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेलाही आपण निश्चितपणे नष्ट करू शकू. शेवटी जनतेने घ्यावयाची खबरदारी हेदेखील कोरोनाविरुद्धच्या लढय़ातील एक मुख्य अस्त्र आहे. आजचा गुढीपाडवा कोरोना सावटाखालीच आला असला, तरी कोरोनावरील अंतिम विजयाचा दृढसंकल्प करूया आणि त्यासाठी आवश्यक असणाऱया खबरदारीची गुढी आज घराघरांत उभारूया!

गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्यावर कोरोना संकटाची भीषण सावली होती. आजच्या गुढीपाडव्यावर कोरोनाच्या दुसऱया लाटेचे त्याहीपेक्षा भयंकर सावट आहे. कोरोनासारखी महामारी, त्यामुळे झालेला देशव्यापी कडकडीत लॉक डाऊन, कोरोनाची अनामिक दहशत अशा एका विचित्र वातावरणात गेल्या वर्षी गुढीपाडवा आला होता. 21 दिवसांच्या लॉक डाऊनमुळे कोरोना संपेल अशी एक आशाही होती. गुढी उभारणाऱया प्रत्येक मनात अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ त्यावेळी होता. आता वर्षभरानंतर परिस्थिती काय आहे? फक्त वर्ष बदलले; परिस्थिती तीच आहे. महाभारताचे युद्ध 18 दिवसांत संपले, कोरोनाविरुद्धचे युद्ध आपण 21 दिवसांत संपवू असे त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते. आता एक वर्ष उलटले तरी ना कोरोना संपला, ना त्याविरोधातील आपली लढाई संपली. उलट कोरोनाच्या दुसऱ्या महाभयंकर तडाख्यामुळे पुन्हा एकदा लॉक डाऊनच्या उंबरठय़ावर महाराष्ट्र उभा आहे. फरक इतकाच की, गेल्या वर्षी कोरोनाचा आजार, त्यावरील उपचार याबाबत सर्वच पातळय़ांवर एक संभ्रम होता. आता चित्रं बरेच पालटले आहे. कोरोना उपचारांमध्ये

बरीच सुधारणा

झाली आहे. सरकारतर्फे आरोग्य सुविधा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध केल्या जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना लसीकरणात आपल्या देशाने जगात आघाडी घेतली आहे. मात्र हे सगळे असूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भीषण सावट गुढीपाडव्यासारख्या महत्त्वाच्या सणावर आहे. मधल्या काळात कमी झालेला कोरोना पुन्हा उफाळून आला आहे. महाराष्ट्रात नवीन कोरोनाग्रस्तांचा रोजचा आकडा 50 हजारांच्या पार, तर देशभरात लाख-सवा लाखाच्या घरात पोहोचला आहे. या परिस्थितीचे खापर फक्त ‘अनलॉक’ प्रक्रियेमुळे सुरू झालेल्या दैनंदिन चलनवलनावर फोडता येणार नाही. रुतलेले अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ते आवश्यकच होते, पण हे सर्व होत असताना जनतेनेही ‘मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग’ या त्रिसूत्रीबाबत गाफील राहून चालणार नव्हते. दुर्दैवाने काही मंडळींच्या बेफिकिरीमुळे महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडला आहे आणि त्याच सावटाखाली याही वर्षीचा गुढीपाडवा सर्वांना साजरा करावा लागणार आहे. हिंदूंचा नववर्षारंभ अशा पद्धतीने अटीतटीच्या वातावरणात व्हावा ही दुःखाचीच बाब आहे. मात्र शेवटी ‘जान है तो जहान हैं’. माणसांचा

जीव वाचविणे

हेच याघडीचे परमकर्तव्य आहे. या परमकर्तव्याची आठवण आजच्या गुढीपाडव्याचे चैतन्य प्रत्येकाला करून देईल अशी अपेक्षा आहे. गुढीपाडवा म्हणजे अशांतता, वैरभाव, अस्थिरता यावर विजय मिळवून देणारा सण. आज देशात, विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भीषण अशांततेचे आणि अस्थिरतेचे थैमान घातले आहे. त्यावर विजय मिळविण्याचा संकल्प आज प्रत्येकाने गुढी उभारताना करायला हवा. प्रभू श्रीरामांचा वनवास संपला म्हणून साजरा होणारा गुढीपाडवा आज कोरोनामुळे पुनः पुन्हा येणारा ‘एकांतवास’ संपावा या हेतूने साजरा करावा लागणार आहे. कोरोनाशी संपूर्ण जगच लढत आहे. हिंदुस्थान आणि महाराष्ट्रही लढत आहे. सरकार, प्रशासकीय यंत्रणा, जनता सगळेच या संकटाला आपापल्या परीने तोंड देत आहेत. सरकारचे प्रयत्न आणि जनतेची ‘खबरदारी’ या जोरावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेलाही आपण निश्चितपणे नष्ट करू शकू. शेवटी जनतेने घ्यावयाची खबरदारी हेदेखील कोरोनाविरुद्धच्या लढय़ातील एक मुख्य अस्त्र आहे. आजचा गुढीपाडवा कोरोना सावटाखालीच आला असला, तरी कोरोनावरील अंतिम विजयाचा दृढसंकल्प करूया आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘खबरदारी’ची गुढी आज घराघरांत उभारूया!

आपली प्रतिक्रिया द्या