सामना दणका; हनुमान कोळीवाड्याच्या पुर्नवसनाच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, उरण

मागील ३२ वर्षीपासून पुर्नवसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या  वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाच्या पुर्नवसनासाठी नव्याने उरण तालुक्यातील जसखार महसूल हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या असून उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवळे यांनी जेएनपीटी अधिकाऱ्यांसह  सोमवारी (7 जानेवारी) जागेची स्थळ पाहणी केली. वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचे नियम आणि शासकीय मानकानुसार पुनर्वसन करण्यात आलेले नाही.उरण शहरातील बोरी- पाखाडी  महसूल हद्दीत  जेएनपीटीने हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन केले आहे.मात्र अपुऱ्या जागेत झालेल्या पुनर्वसित सर्वच घरांना  वाळवीने पोखरले आहे. आवश्यकतेनुसार १७ हेक्टर जागा आणि सोयीसुविधा उपलब्ध करुन त्याठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी सातत्याने  वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी लाऊन धरली होती. त्यांच्यावरील अन्यायाची बातमी दै.सामनाने प्रकाशित केल्यानंतर अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे.

वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या जागेची सोमवारी (7 जानेवारी) उपविभागीय अधिकारी  दत्तात्रेय नवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थळ पाहणी करण्यात आली.यावेळी जेएनपीटी अधिकारी राजेश म्हात्रे, उरण तहसीलदार कविता गोडे,,हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ,मंडळ अधिकारी,तलाठी आदी  उपस्थित होते.पाहणीचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी  दत्तात्रेय नवळे  आणि जेएनपीटी अधिकारी राजेश म्हात्रे यांनी दिली.

तहसीलपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यत,जेएनपीटी-राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी मागील ३२ वर्षापासून संघर्ष करीत शासनाचे उंबरठे झिजवले. या ३२ वर्षात ५००हून अधिक बैठका पार पडल्या. मात्र वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा न्याय आणि पुनर्वसनापासुन अद्यापही वंचितच राहिला आहे.वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या अन्यायाला दै.सामनाने वाचा फोडली आणि शासनाला खडबडून जाग येऊन गावाच्या पुर्नवसनासाठी नव्याने उरण तालुक्यातील जसखार महसूल हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत.

जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा आणि शेवा ही दोन गावे विस्थापित करण्यात आली. हनुमान कोळीवाडा गावचे जसखार येथील सर्व्हे नंबर 286, 288 व 289 या एकूण 17 हेक्टर जागेत पुनर्वसन करण्याचे आश्वासन जेएनपीटीने दिले. ही जागा जेएनपीटीने राखीवही ठेवली. प्रत्यक्षात 1985 मध्ये जेएनपीटी बंदर उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन उरण शहराजवळील बोरीपाखाडी (भवरा) गावाजवळ करण्यात आले.

बोरीपाखाडी गावात चिखल आणि वाळवीग्रस्त मातीच्या जागेत भराव करून जेएनपीटीने अवघ्या दोन हेक्टर जागेत या कोळीवाडय़ातील 256 कुटुंबांना अक्षरशः ट्रान्झिट कॅम्पसारखे कोंबले. त्यामुळे उभारलेल्या अपुऱया जागेत हे गावकरी गेले 32 वर्षे श्वास घुसमटून जगत आहेत. त्यातच संपूर्ण गावालाच वाळवीने पुरते पोखरून टाकले आहे. मासेमारी हेच उपजीविकेचे साधन असलेल्या येथील गरीब गावकऱयांना घरभाडे परवडत नसल्याने ते इतरत्र न जाता वाळवीच्या दहशतीखाली जीवमुठीत धरून आपले जीवन कंठत आहेत. हनुमान कोळीवाडय़ाचे सरपंच परमानंद कोळी यांनी जेएनपीटीने केलेल्या फसवणुकीचा पर्दाफाशच विधानसभेच्या विनंती अर्ज समितीकडे दिलेल्या कागदोपत्री पुराव्यातून केला होता.