सब का साथ आणि मोदींच्या मित्राचा विकास, असे होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे यांचा सरकारला कडक इशारा

मी मुख्यमंत्री असताना मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागितली तर केंद्र सरकारने कोर्टात धाव घेत जागा देण्यास नकार दिला. मात्र आता पंतप्रधानांच्या मित्रासाठी मुलुंड आणि मिठागराची जागा एका फटक्यात देऊन टाकली. हाच तुमचा विकास आहे का, असा खडा सवाल सरकारला करीत ‘सब का साथ आणि पंतप्रधानांच्या मित्राचा विकास असे होऊ देणार नाही,’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.

शिवसेना शाखा भेटीअंतर्गत आज उद्धव ठाकरे यांनी धारावी येथे शाखांना भेटी देत धारावीकरांशी संवाद साधला. धारावीची जागा बळकावण्यासाठी अदानीकडून तुम्हाला पैशाचे प्रलोभन दाखवण्यात येईल, पण कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. कारण आता विकला गेलात तर तुमच्या पुढच्या पिढीचे आयुष्य बरबाद होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अदानीच्या कोणत्याही दबावाला बळी पडू नका. तुमची ताकद काय आहे हे दाखवून द्या. धारावीकरांनो, ठाम उभे रहा, शिवसेना तुमच्यासोबत आहे, असे ठाम आश्वासन त्यांनी धारावीकरांना दिले. धारावीकरांना याच ठिकाणी 500 चौरस फुटांचे घर मिळायला हवे, असेही ते म्हणाले. आता निवडणुका तोंडावर आल्यात. त्यामुळे जागरूक रहा. दिल्लीत आपला आवाज उठवणारा खासदार पाहिजे की खुर्चीखाली जाऊन दिल्लीश्वरांचे तळवे चाटणारा गद्दार खासदार पाहिजे, याचा निर्णय घ्या. आम्ही लढायला तयार. मी तुमच्यासाठीच मैदानात उतरलो असल्याचे सांगत आपण जिंकणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासापीठावर शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते अॅड. अनिल परब, माजी आमदार बाबूराव माने, माजी नगरसेविका विशाखा राऊत, श्रद्धा जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.

एकदा मिठागरात गेलात तर पुन्हा धारावी दिसणार नाही

माझ्या धारावीकरांना 500 चौरस फुटांचे घर मिळायलाच हवे अशी मागणी करतानाच घरे बांधेपर्यंत म्हणून एकदा मिठागरात गेलात तर तुम्हाला पुन्हा धारावी दिसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. वांद्रे रेक्लमेशन टेंडरही अदानीला देणार असल्याचा गौप्यस्पह्टही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईकरांची कशी वाट लावायची याचेच प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. हे पाहून जीव जळते. आपले जीवन बरबाद करून कोणतेही डील करणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, धारावीकरांच्या हृदयात आणि मनात शिवसेना आहे. शिवसेनेचे व धारावीकरांचे हे नाते कोणीच संपवू शकणार नाही, असे शिवसेना नेते–खासदार संजय राऊत म्हणाले. धारावीच्या विकासाची पहिली वीट शिवसेना रचेल, असा विश्वास व्यक्त करताना धारावीच्या विकासातून मुंबईचा विकास व्हायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.