वानखेडेवर सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वानखेडेच्या मैदानावर क्रिकेटचे धडे गिरवत मोठा झालेला आणि आता क्रिकेटचा देव अशी ओळख मिळवलेला सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे बुधवारी (दि. 1) अनावरण झाले आणि वानखेडे स्टेडियम पुन्हा एकदा ‘सचिन… सचिन…’ या घोषणेने दुमदुमले.

या ऐतिहासिक सोहळय़ासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह, आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव आशीष शेलार, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे आणि पदाधिकारी उपस्थित होते. या पुतळय़ाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे, या वेळी सचिन तेंडुलकर आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते.

हा दिवस माझ्या आयुष्यातील खूप खास दिवसांपैकी एक आहे. फेब्रुवारी महिन्यात आशीष शेलार आणि अमोल काळे यांनी फोनवरून मला अशा पूर्णाकृती पुतळय़ाबाबत कल्पना दिली होती. त्याही वेळी काय बोलावं हे मला सुचत नव्हतं. पण हा माझा खूप मोठा सन्मान आहे, अशी भावना सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केली. तसंच त्यांनी या सन्मानाबद्दल एमसीएचे आभार मानले.

सचिन तेंडुलकर जगभरातील तरुण आणि उगवत्या खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहेत. त्याच्याकडे पाहून आज अनेक तरुण खेळाडू क्रिकेटकडे वळतात. त्यामुळे त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशातील आणि जगातील त्यांच्या चाहत्यांसाठी काहीतरी भेट देण्याचं आमच्या मनात होतं. त्यातून ही पुतळय़ाची संकल्पना पुढे आली. या पुतळय़ाद्वारे युवा क्रिकेटपटूंना चांगली प्रेरणा मिळेल, असं मत एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केलं. बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनीही सचिन यांच्या विक्रमांचा उल्लेख करत त्यांच्या क्रिकेटप्रतिच्या निष्ठsचाही दाखला दिला. आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि आशीष शेलार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

हा क्षण कायम स्मरणात राहील!

वानखेडे स्टेडियममध्ये मी अनेक सुखद क्षण अनुभवले आहेत. 1987 मध्ये अवघ्या 14 व्या वर्षी विश्वचषकादरम्यान बॉल-बॉय म्हणून माझी निवड झाली होती. त्या वेळी सुनील गावसकर यांनी मला आवर्जून ड्रेसिंग रूममध्ये बोलावलं होतं. त्यानंतर मुंबईसाठी खेळताना याच स्टेडियममध्ये अनेकदा रणजी ट्रॉफी उंचावली आहे. 2011 मध्ये तर माझ्या आयुष्यातला सर्वात भाग्याचा दिवस उजाडला आणि आम्ही विश्वचषक उंचावला. 2013 मध्ये माझ्या कारकिर्दीतला शेवटचा सामना याच मैदानावर खेळलो. ते सगळे क्षण आज माझ्या डोळय़ांसमोरून झर्रकन सरकत आहेत. त्या क्षणांसारखाच आजचा क्षणही कायम स्मरणात राहील.

विनातिकीट बघितलेली मॅच

याप्रसंगी सचिन तेंडुलकर यांनी वानखेडे स्टेडियमशी जोडलेल्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 1983 मध्ये हिंदुस्थानने विश्वचषक जिंकल्यानंतर वेस्ट इंडीज संघ हिंदुस्थान दौऱयावर आला होता. मुंबईच्या मॅचला वांद्रय़ाच्या साहित्य सहवास येथील काही मोठे लोक जाणार होते. त्यांनी मलादेखील सोबत घेतलं. आम्ही नॉर्थ स्टँडमधून ती मॅच बघितली. परत जाताना त्या मोठय़ा माणसांची चर्चा सुरू होती आणि एक जण म्हणाला, ‘झालं ना मॅनेज व्यवस्थित!’ वास्तविक, आम्ही 25 जण होतो आणि तिकिटं 24 होती. त्यांनी 10 वर्षांच्या मला लपवून नेलं होतं, अशी आठवण सांगताच हशा पिकला.

…म्हणून कर्णधारपद सोडलं

या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांच्या कर्णधारपदाबद्दल विषय निघाला. त्याबाबत सचिन यांनीच खुलासा केला. 2007 मध्ये आम्ही इंग्लंडमध्ये खेळत होतो. त्या वेळी शरद पवार साहेबांनी मला भेटीसाठी बोलावलं. त्यांनी मला कर्णधारपद स्वीकार, अशी गळ घातली. पण त्या वेळी मी शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त नव्हतो. त्यामुळे मी पवार साहेबांना विनंती करत कर्णधार म्हणून नाही, तर एक खेळाडू म्हणून देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याच वेळी मी महेंद्रसिंह धोनीला कर्णधार करावं असा सल्ला दिला, असं सचिन म्हणाले.