मोदी हादरलेत आता दिल्लीचे तख्त हादरवायची वेळ आली आहे! अकाली दलाने ठोकला शड्डू

कृषी विधेयकांवरून भाजपचा आणखी एक सर्वात जुना मित्र पक्ष असलेला अकाली दल पक्ष हा त्यांच्यापासून दुरावला आहे. या पक्षाचे प्रमुख असलेल्या सुखबीरसिंग बादल यांनी म्हटलंय की ‘मोदी हादरले आहेत आता दिल्लीच्या तख्ताला हादरे देण्याची वेळ आली आहे.’ बादल यांनी सगळ्या राजकीय पक्षांनी एका मंचावर येऊन केंद्राविरोधात लढण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अन्न उद्योगप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. केंद्र सरकारची कृषी विधेयके शेतकरी विरोधी असल्याचा त्यांनी आरोप केला होता.

कृषी विधेयकांच्या मुद्दावरून उत्तर हिंदुस्थानातील काही राज्यांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पंजाबमध्ये जे शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांचे नेतृत्व करण्याची तयारी बादल यांनी दर्शवली आहे. सुखबीरसिंग बादल आणि त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांच्या नेतृत्वात अकाली दलच्या कार्यकर्त्यांनी मलौत-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर 3 तास रास्ता रोको आंदोलन केले. बादल दाम्पत्य ट्रॅक्टरवर बसून आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले होते.बादल यांनी आंदोलनाच्या ठिकाणी केलेल्या भाषणात म्हटले की ‘आपल्या मार्गात काही उपद्रवी तत्वे आहेत, त्यांच्याशी लढूया आणि सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊयात. असं झालं तर आपण दिल्लीच्या तख्ताला आणि पंजाबमधील सरकारला आपण हादरे देऊ शकू.’

शेतकऱ्यांच्या अधिकारांसाठी आपण लढत असल्याचे बादल यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून चंदीगडसह चार ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोर्चांना सुरूवात करणार असल्याचेही ते म्हणाले. हरसिमरत यांनी मंत्रिपदाचा रामीनामा देणं हे अणूबॉम्ब पडल्याप्रमाणे होतं असं म्हणताना बादल यांनी हरसिमरत यांच्या राजीनाम्यामुळे भाजप, पंतप्रधान नरेंद्र देखील हादरले असल्याचं म्हटलं आहे. यावेळी हरसिमरत कौर यांनी बोलताना म्हटले की देशाचे जवान सीमेवर लढत आहे, देश कोरोनाशी लढतोय अशावेळी हे विधेयक आणले जाऊ नये. संख्याबळाच्या आधारावर हे विधेयक रेटण्याचा प्रयत्न होत असल्यापासून आपण याला विरोध केला होता आणि म्हणूनच आपण मंत्रिपद सोडलं असं त्यांनी म्हटलं आहे. बादल यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्याची तयारी दाखवली असली तरी शेतकरी संघटनांनी आतापर्यंत अनेकदा आपण कोणाचेही नेतृत्व स्वीकारणार नसल्याचे म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या