साहीत्यकट्टा- ’झिनझिनाट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>रजनीश राणे

साहित्य क्षेत्रातील चर्चांना तसा काही आधार नसतो. मात्र चर्चा होते आणि होतच राहते हे प्रसिद्ध कवी डॉ. महेश केळुसकरांनी दिलेल्या कोमसापच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याइतकेच खरे आहे. त्यांच्या एका कवितेचा शेवट

‘…हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिनझिनाट’ असा करणारे केळुसकर ‘अंगाक खेटलंस, पण नाय पटलंस’ असे म्हणत आता कोमसापपासून दुरावले आहेत. हा खरा ‘झिनझिनाट’ आहे.

साहित्य, साहित्यिक यावर काही मनोगत, भाष्य करायचे म्हटले की आपसूकच पेनातील शाईत एक जडत्व येते. उगाचच प्रतिभेला पंख फुटू लागल्याचे भास होतात. डोळय़ांवरील चष्म्याच्या काचाही धुरकट होतात. कागदाची चवड समोर ठेवून गंभीर व्हावे लागते. हा सारा अभिनिवेश एकदा का जमला की साहित्यावर तुम्ही बेफाम आणि बेभान लिहू शकता असा एक समज आहे. आत्ताही अवस्था हीच आहे. अवघे कोकण सध्या सॉलिड तापले आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी निवडणुकीमुळे आणि आता ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’तील अंतर्गत कलहामुळे. कोमसापचे अध्यक्ष कवी डॉ.महेश केळुसकर यांनी राजीनामा दिल्याने कोकणातील नवोदित आणि प्रस्थापित असे साहित्यिकांचे दोन्ही वर्ग लाल मातीसारखे तांबडेबुंद झाले आहेत. कोकणातील तापमापकाचा पारा वाढण्यासाठी हे सुद्धा एक कारण असावे असा स्कायमेटचा अंदाज आहे.

कोकणला तसे आजवर हक्काचे असे फार कमीच मिळाले. म्हणजे कोकणात रेल्वे आली, पण रेल्वेत कोकणला जागा मिळाली नाही. कोकणच्या ताटात कायम उकडय़ा तांदळाची पेज आणि कुळथाची पिठीच आली. मात्र 24 मार्च 1991 रोजी कोकणला पहिल्यांदाच काहीतरी हक्काचे मिळाले होते. साहित्य क्षेत्रात कोकणातील साहित्यिक, साहित्यप्रेमी तसा उपेक्षितच होता. साहित्य महामंडळाचा कारभार पुणे-नागपुरातून हाकला जातो आणि त्यात कोकणला स्थान नाही ही स्थिती आजही कायम आहे. 1991 मध्ये मात्र मधु मंगेश कर्णिक यांनी ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ अर्थात कोमसापची स्थापना केली आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणी पट्टय़ातील नवोदितांना, प्रस्थापितांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. या व्यासपीठावरून अनेक जण लिहिते झाले, अनेक लिहिते हात बोलते झाले. विशेष म्हणजे ‘कोमसाप’ने गेल्या 28 वर्षांत हजारो वाचक तयार केले. साहित्याचा प्रचार आणि प्रसार ही सेवा गेली तीन दशके अव्याहतपणे सुरू असतानाच महेश केळुसकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि कोकण पुन्हा तापले. नगर वाचनालयात वर्तमानपत्रांआड चर्चा होऊ लागली. कटवडय़ाचा तुकडा मोडताना कुजबूज होऊ लागली. केळुसकरांच्या राजीनाम्याची (त्यांनी सांगितलेली कारणे बाजूला ठेवून) कारणे शोधू जाऊ लागली.

मधु मंगेश कर्णिक हे ‘कोमसाप’चे संस्थापक. म्हणजे गेल्या काही वर्षांपर्यंत तेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. संस्थेने रत्नागिरीच्या मालगुंड येथील कविश्रेष्ठ केशवसुतांच्या घरातूनच आपल्या कार्याची ‘तुतारी’ फुंकली आणि कविश्रेष्ठांच्या स्मारकाची उत्तम देखभाल, निगराणीही केली. कोमसापचे असे साहित्यिक प्रचारकार्य उत्तम सुरू असतानाच केळुसकर यांनी राजीनाम्याची ‘तुतारी’ फुंकल्याने तुतारीचा स्वर नाराजीचा, संस्थेंतर्गत ढिसाळ कारभाराचा की नवे काहीतरी शोधण्याचा याचा धांडोळा आता घेतला जात आहे. मधुभाई आणि केळुसकर यांचे नाते, सख्य तसे अतूटच. दोघेही एकमेकांचे चाहते आहेत असे कोकणवालेच म्हणतात. दोघांचेही मूळ सिंधुदुर्गातील आणि गावही शेजारचेच. तसा हा भौगोलिक संदर्भ झाला, पण वैचारिक संदर्भही एकच आहे. कवी वसंत सावंत यांच्यानंतर सिंधुदुर्गात डॉ. महेश केळुसकर यांचे नाव घेतले जाते. मधुभाईंची साहित्यसेवा तर ऋषितुल्यच आहे. तरीही केळुसकर यांनी राजीनामा का दिला किंवा त्यांना तो का द्यावासा वाटला याची कारणे शोधणे गरजेचे आहे. या विषयावर केळुसकर आणि मधुभाई दोघेही एक तर बोलत नाहीत किंवा त्रोटक बोलतात. केळुसकर म्हणतात, ‘‘फेसबुक’’वरील माझी पोस्ट हीच एकमेव प्रतिक्रिया’’, तर मधुभाई ‘‘केळुसकरांशी बोलेन’’, एवढे सांगून विषय संपवतात. केळुसकर आणि मधुभाई यांचे अतूट नाते खरेच दुरावले आहे का? उद्या कदाचित हे नाते जोडलेही जाईल. बेमालूमपणे चिकटवलेही जाईल, पण मधला तो अतिसूक्ष्म थर परकाच, सांध्याची खूण दाखवणारा, स्टिकोप्लास्टसारखा… त्याचे काय? या प्रश्नानेच सर्वजण हैराण आहेत.

कोमसापने गेल्या तीन दशकांत साहित्य क्षेत्रात भरीव कार्य केले असले तरी आता अनेक शाखा बंद पडल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. केवळ साहित्यप्रेमी किंवा उत्तम वाचक असणाऱयांची शाखा अधिकारीपदी नियुक्ती करावी लागली आहे. हे थोडे विचित्रच आहे, पण वास्तव आहे. कोकणातील काही साहित्यिकांनी कोमसापकडे पूर्णतः पाठ फिरवली आहे. हे संस्थेच्या प्रगतीस मारक तर ठरेलच पण साहित्य क्षेत्राचेही हानी करणारे आहे.

‘कोमसाप’तर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात (आमचा सिंधुदुर्गातील कविमित्र साहित्य क्षेत्रातील एकूणच पुरस्कार वाटपाला ‘भिशी पुरस्कार’ असे गमतीने म्हणतो. म्हणजे ‘‘या वर्षी तू भिशी घे, पुढच्या वर्षी मी घेतो.’’ अर्थात कविमित्राची गंमतीतील टिपणी असल्याने फक्त आणि फक्त ‘कोमसाप’ने रागावण्याचे कारण नाही) तर ‘कोमसाप’च्या या विविध पुरस्कारांमध्ये ‘राजधानी’ पुरस्कार अत्यंत मानाचा समजला जातो. यंदा तो महेश केळुसकर यांना मिळाला आणि वाद पेटला. ‘कोमसाप’मध्ये केळुसकरांविरोधात एक गट कार्यरत आहे हे उघड गुपित आहे. याच गटाने केळुसकरांना जाहीर झालेल्या, दिलेल्या पुरस्काराबद्दल आक्षेप घेतला. ‘‘संस्थाध्यक्षालाच संस्थेने पुरस्कार देणे कितपत योग्य आहे,’’ असा त्यांचा सवाल तर ‘केळुसकरांचे कविता प्रांतातील योगदान पाहता त्यांना पुरस्कार देणे योग्यच’’ असे केळुसकर समर्थकांचे म्हणणे. हा अंतर्गत वाद अखेर बाहेर आला आणि या वादाचे कारण देत पुरस्कार वापसी करत केळुसकर ‘फेसबुक’वर लिहिते झाले. अर्थात त्यांच्या म्हणण्यानुसार राजीनामा काही दिवसांपूर्वीच दिला होता, पण कुणीच त्यावर निर्णय घेत नसल्याने त्यांनी ‘फेसबुक’वरून राजीनाम्याची घोषणा केली.

आता ‘पुरस्कार’ एवढे एकच कारण या राजीनाम्यामागे आहे का? याचा शोध कोमसापचे सदस्यच आपापसात चर्चा करून घेतायत. केळुसकर यांनी नाराज होऊन, संतप्त होऊन राजीनामा दिला हे खरे असले तरी नाराजीचा वा संतापाचा सूर काही पहिल्यांदाच आळवलेला नाही. 2012 च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद निवडणुकीत प्रा. अशोक बागवे उभे होते. तेव्हा बागवे यांनी ‘‘कर्णिक म्हणजे कोमसाप नव्हे’’ असे जाहीर विधान करून ‘कोमसाप’ म्हणजे एकखांबी तंबू आहे का? असा संशयाचा किडा प्रत्येकाच्या मनात सोडला होता. कदाचित म्हणूनच नंतरच्या काळात मधुभाईंनी अध्यक्षपदाचा हार केळुसकर यांच्या गळय़ात घातला असावा अशीही चर्चा आहे. मधुभाईंनी केळुसकर यांना अध्यक्ष तर केले, पण एक कार्याध्यक्षपदही निर्माण केले. केळुसकर यांच्या संतापाचे हेसुद्धा एक कारण असावे असे सांगितले जाते. मधुभाईंनी कार्याध्यक्षपदी नमिता किर यांची नियुक्ती केली तेव्हा केळुसकर संतापले. काही नव्या विश्वस्तांचीही नेमणूक झाली आणि त्यांच्या संतापात अधिकच भर पडली. नमिता किर आणि महेश केळुसकर वाद होऊ लागल्याचे काही सदस्य सांगतात. या वादाला कंटाळूनच केळुसकर यांनी राजीनामा दिल्याचेही सांगण्यात येते.

अध्यक्ष मोठा की कार्याध्यक्ष? असा एक अंतर्गत वाद सुरू होता. शिवाय कार्यकारिणी सभेत केळुसकर कुणाला बोलूच द्यायचे नाहीत असे दोन्ही ‘फेस’ आता साहित्य ‘बुका’वर चितारले जाऊ लागले आहेत. कोमसापमध्ये प्रशासकीय गोंधळ आहे असे केळुसकर गटाचे म्हणणे आहे तर केळुसकर हे नवे सत्ताकेंद्र होऊ पाहत होते, असा त्यांच्या विरोधकांचा आरोप आहे. लोक काहीही बोलतात. राजीनामा देऊन कोमसापातील किती जण आपल्या मागे आहेत याचा अंदाज केळुसकर घेतायत असा काहींचा दावा आहे तर कुणी छातीठोकपणे सांगतो की केळुसकरांना कोमसापमध्ये अडकून पडायचे नाही, त्यांना साहित्य महामंडळावर जायचे आहे. कोमसापला महामंडळाची संलग्नता नसल्याने ते शक्य नव्हते. म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला. अर्थातच साहित्य क्षेत्रातील चर्चांना तसा काही आधार नसतो. मात्र चर्चा होते आणि होतच राहते हे प्रसिद्ध कवी डॉ. महेश केळुसकरांनी दिलेल्या कोमसापच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याइतकेच खरे आहे.

नाटककार राम गणेश गडकरींचा एक किस्सा सर्वश्रुत आहे. गडकरींना एकदा नाटय़ संस्थेच्या उद्घाटनाला बोलावले होते. उद्घाटनाचा नारळ फोडल्यावर गडकरींनी मिश्कीलपणे विचारले, ‘‘संस्थेच्या उद्घाटनाचा नारळ फुटला, आता संस्था कधी फुटणार?…’’ विनोदाचा भाग सोडा, पण कोकणला दुहीचा शाप आहे. त्याला ‘कोमसाप’ ही कोकणातील तमाम साहित्यिकांची शिखर संस्था अपवाद ठरावी एवढीच त्या रवळनाथचरणी प्रार्थना आहे. संस्था जगायलाच हवी. नाराजीचे सारे मळभ दूर व्हायला हवे आणि पुन्हा एकदा स्वप्राणाने तुतारी फुंकायला हवी… पण त्यासाठी डॉ. महेश केळुसकर आणि मधु मंगेश कर्णिक यांनी एकमेकांशी आणि नंतर अवघ्या कोकणशी बोलायला हवे… खुलेपणाने, बिनधास्त!!

‘पांदनीत भेटलंस
अंगाक खेटलंस,
काळोख किनाट
हातात हात घेतलंस अकस्मात
झालो झिनझिनाट’
असं लिहिणारे केळुसकर ‘अंगाक खेटलंस, पण नाय पटलंस’ असे म्हणत आता कोमसापपासून दुरावले आहेत. हा खरा ‘झिनझिनाट’ आहे.

[email protected]