
देशविदेशातून हजारो भक्त शिर्डीत रोज येत असतात. भाविकांकडून दहा रुपयांपासून लाखोंचे दान अर्पण केले जाते. मात्र नोटाबंदीनंतर साईबाबा संस्थानने भक्तांना 30 सप्टेंबरनंतर दानपेटीत दोन हजारांच्या नोटा टाकू नका, असे आवाहन केले आहे. 2016 मध्ये 500, 1000च्या नोटांवर बंदी घातली तेव्हा भक्तांनी या नोटांचे मोठय़ा प्रमाणावर दान केले. बंदी घातलेल्या तीन कोटी रुपयांच्या नोटा साईबाबा संस्थानकडे अद्याप पडून आहेत. त्यामुळे यावेळी भक्तांनी 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू नयेत, असे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी सांगितले.



























































