सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा, सायना, सिंधू, प्रणॉय यांची आगेकूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑलिम्पिक कास्यपदक विजेत्या सायना नेहवाल हिने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत देत सिंगापूर खुल्या सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. याचबरोबर पी. व्ही. सिंधू आणि एचएस प्रणॉय या फॉर्ममध्ये असलेल्या हिंदुस्थानी खेळाडूंनीही यांनीही अंतिम आठमध्ये प्रवेश केला.

मागील काही वर्षांपासून दुखापत आणि खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या सायनाने सातत्याने अपयशी ठरत आहे. मात्र या स्पर्धेत सायनाने पाचव्या मानांकित चीनच्या बिंग जियाओ हिचा 21-19, 11-21, 21-17 असा पराभव करून आगेकूच केली. दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतही तिला सहभागी होता आले नव्हते. मलेशिया मास्टर्स व बार्सिलोना स्पेन मास्टर्स स्पर्धेतही सायनाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले होते. फॉर्ममध्ये परतलेल्या सायनाकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे.

तृतीय मानांकित पी. व्ही. सिंधूने व्हिएतनामच्या हुइ लिन एंगुयेन हिचा चुरशीच्या लढतीत 19-21, 21-19, 21-18 असा पराभव करून आगेकूच केली. आता तिच्यापुढे चीनच्या हान यी हिचे आव्हान असेल. पुरुष एकेरीत 19 वे मानांकन असलेल्या एचएस प्रणॉयने चतुर्थ मानांकित चिनी तैपेईच्या चोऊ तियेन चेन याचा तीन आठवडय़ांत दुसऱयांदा पराभव केला. प्रणॉयने 1 तास 9 मिनिटांपर्यंत रंगलेल्या आजच्या लढतीत 14-21, 22-20, 21-18 असा विजय मिळवला. आता त्याची गाठ जपानच्या कोडाइ नाराओका याच्याशी पडेल. मात्र बुधवारी किदाम्बी श्रीकांतला हरवणाऱया हिंदुस्थानच्या मिथुन मंजुनाथचे आव्हान संपुष्टात आले. त्याला आयर्लंडच्या एन. एंगुयेन 21-10, 18-21, 21-16 असे हरवले. थायलंडच्या बुसानन ओंगबांरुंगफन हिचा पराभव करणाऱया अष्मिता चालिहा हिच्यावर गुरुवारी चीनच्या हान यी हिने 21-19, 21-13 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली.

अर्जुन-ध्रुव जोडीची आगेकूच

एम. आर. अर्जुन व ध्रुव कपिला या हिंदुस्थानी जोडीने पुरुष दुहेरीत गोह जे पैइ व नूर इजुद्दीन या सहाव्या मानांकित मलेशियन जोडीवर 18-21, 24-22, 21-18 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला दुहेरीत पुजा डांडु व आरती सारा सुनील या हिंदुस्थानी जोडीला सहाव्या मानांकित चीनच्या ली वेन मेइ व डु यू या जोडीने 21-12, 21-6 असे हरवले.