धारशिवमध्ये संत गोरोबा काकांच्या घराच्या छताचा भाग कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिवमधील असणाऱया संत गोरोबा काका यांच्या घराच्या छताचा काही भाग रविवारी रात्री कोसळला. पुरातत्व विभागाच्या वतीने लाखो रुपये खर्च करुन या घराचे बांधकाम करण्यात आले होते. नव्याने बांधण्यात आलेल्या या घराचा छताचा काही भाग कोसळल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

तेर येथील श्री संत गोरोबा काकांना वारकरी संप्रदायात खूप मोठे स्थान आहे. तेर येथे तेरणा नदीच्या काठावर  संत गोरोबा काका यांचे मोठे समाधी मंदिर आहे. तसेच  संत गोरोबा काका ज्या ठिकाणी राहत होते त्यांचे घर जीर्ण झाल्याने पुरातत्व विभागाच्या वतीने त्या घराचे पुन्हा बांधकाम करण्यात आले. यामध्ये 2009 – 10 मध्ये या बांधकामासाठी सुमारे 75 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. तसेच याबांधकामामध्ये संत गोरोबाकाकांचे घर त्या काळाप्रमाणे दिसावे यासाठी मातीचा वापर करण्यात आला होता. परंतू हे काम अतिषय निकृष्ट दर्जाचे झाल्याने पावसाळ्यात या छताला मोठय़ा प्रमाणात गळती लागली होती.

या ठिकाणी देश, विदेशातून पर्यटक, भाविक, नागरिक येतात. त्यामुळे गोरोबा काकाच्या घराची मोठय़ा प्रमाणात दूरवस्था झाल्यामुळे इतिहास प्रेमी संशोधक नागरिकातून तीव्र संताप होत होता. त्यामुळे 2014 – 15 मध्ये या घराच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त 32 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून संत गोरोबा काका यांच्या घराची दुरुस्ती करण्यात आली होती.

वास्तविक या दुरुस्तीच्या कामाला चार वर्षेही पुर्ण होत नाहीत, तोपर्यंत या घराच्या लाकडी छताचा भाग रविवारी रात्री कोसळला आहे. छताचा इतर भागालाही वाळवी लागली असून तो भागही कमकूवत झाला आहे. शासनाच्या वतीने आत्तापर्यंत या संत गोरोबाकाकांच्या घरावर 1 कोटी 7 लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करुनही घराचे काम निकृष्ट झाले असल्याने भाविक, इतिहासप्रेमीतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.