
बनावट कागदपत्रांच्या आधारे विकासकाची स्वस्तात घरे विकून 65 लाख रुपयांची फसवणूक करणाऱयाला साकीनाका पोलिसांनी अटक केली. पूर्वेश व्होरा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी पकडू नये म्हणून पूर्वेश हा सतत घरे बदलायचा. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विरार येथे फिल्डिंग लावली. डिलिव्हरी बॉय बनवून पोलीस पूर्वेशच्या घरी गेले. फसवणुकीच्या गुन्ह्यात पूर्वेशला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्याच्याकडे पूर्वेश हा पूर्वी कामाला होता. नवीन घर पाहण्यासाठी येणाऱया ग्राहकांना तो घराचा दर कमी सांगत असायचा. त्यानंतर बनावट कागदपत्रे देऊन ती घरे त्यांना देत असायचा. फेब्रुवारी महिन्यात फसवणुकीचा प्रकार विकासकाच्या लक्षात आला. 65 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी विकासकाने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पूर्वेशविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक वाल्मीक कोरे, भुवड, खैरमोडे, बंगाळे आदींच्या पथकाने तपास सुरू केला.
पोलिसांनी पकडू नये म्हणून पूर्वेशने त्याचा मोबाईल बंद करून ठेवला होता. तसेच तो सतत घर बदलत असायचा. कोणालाही आपली माहिती मिळू नये म्हणून तो कमीत कमी लोकांशी संपर्क ठेवत असायचा. घरची माहिती मिळू नये म्हणून त्याने खबरदारी घेतली होती. पूर्वेश हा विरार परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला पकडण्यासाठी पोलीस डिलिव्हरी बॉय बनले. खाद्य पदार्थाची ऑर्डर घेऊन पोलीस पूर्वेशच्या घरी गेले. तेथून त्याला अटक केली. फसवणुकीचे पैसे त्याने कोणाला दिले याचा तपास पोलीस करत आहेत.























































