
मुंबईसह देश हादरवणाऱया साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आरोपी मोहन चौहान याला आज अखेर दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. आरोपीने केलेल्या अमानुष बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशी देण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकार आणि पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. आरोपीच्या अटकेनंतर हा खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालवून वर्षभराच्या आत न्याय देण्यात राज्य सरकारला यश आले आहे.
साकीनाका येथे 10 सप्टेंबर 2021 ला गणेश चतुर्थीच्या दिवशी घडलेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण मुंबई हादरली होती. या प्रकरणातील नराधम मोहन चौहानला (45) पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीने चालवण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार हा खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालवण्यात आला. दिंडोशी फास्ट ट्रक न्यायालयातून सुरू असलेल्या या खटल्यात सोमवारी मोहन चौहान याला हत्या आणि बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यावर राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आज दुपारी दिंडोशी सत्र न्यायालयाने मोहन चौहान याला कोणतीही दयामाया न दाखवता केलेला गुन्हा हा अत्यंत क्रूर असून दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचे स्पष्ट करत चौहान याला फाशीची शिक्षा सुनावली.
तब्बल 25 दिवस केला होता पाठलाग
आरोपी मोहन चौहान हा महिलेच्या परिचयाचा होता. त्याने तब्बल 25 दिवस पीडितेचा पाठलाग केला. 25 दिवस मागे राहूनही संबंधित महिला दुर्लक्ष करीत असल्याच्या रागातूनच त्याने 10 सप्टेंबरला महिलेचा पाठलाग केला आणि निर्जनस्थळी कोणी नसल्याचा फायदा उचलत अमानुष बलात्कार आणि हत्या केली, असे पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशिटमध्ये म्हटले आहे.
346 पानांची चार्जशीट
साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी दिंडोशी कोर्टात 346 पानी चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये आरोपीकडे दुर्लक्ष करून प्रतिसाद दिला नसल्यानेच अत्याचार आणि निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी केवळ 18 दिवसांत चार्जशीट दाखल केली. यामध्ये 77 जणांचे जबाब नोंदवले गेले. यामध्ये पीडितेला जखमी स्थितीत पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिलेल्या सुरक्षा रक्षकाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
नेमके काय घडले त्या रात्री…
साकीनाका येथे खैरानी रोडवर पुठ्ठय़ाची कंपनी आहे. 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने कंट्रोल रूमला फोन करून एका बाईला मारहाण सुरू असल्याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रूमने संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांना कळवले. संबंधित अधिकारी दहा मिनिटांच्या आत तिथे पोहोचले होते. तिथे त्यांना एका उघडय़ा टेम्पोत महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली. तिला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान तिच्यावर अत्यंत अमानुष पद्धतीने बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. या महिलेचा दुसऱया दिवशी 11 सप्टेंबरला मृत्यू झाला.



























































