
चर्चगेट आणि अंधेरी स्थानकात आता रेल्वे प्रवाशांची चंपी होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने या दोन्ही स्थानकांत अद्ययावत युनिसेक्स सलून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना येथे केस कटिंग, दाढी आणि फेशियलही करता येणार आहे.
पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकातच सलून सेवा देण्याची संकल्पना राबवली आहे. त्यानुसार चर्चगेट आणि अंधेरी स्थानकात महिला आणि पुरुष प्रवाशांसाठी वातानुकूलित केशकर्तनालय आणि स्पा केंद्र खुले केले आहे. पश्चिम रेल्वेने ही सेवा नॉन फेअर रेव्हेन्यू (एनएफआर) अंतर्गत सुरू केली आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकातच सुविधा मिळणार असून पश्चिम रेल्वेला महसूल मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंधेरी स्थानकावरील एलिव्हेटेड डेकवर 320 चौरस फूट क्षेत्रफळ परिसरात सलून सुरू केले असून त्या माध्यमातून रेल्वेला वर्षाला नऊ लाख रुपये परवाना शुल्क मिळणार आहे, तर चर्चगेट स्थानकावरील कॉन्कोर्स हॉलमध्ये 388 चौरस फुटाचे सलून उभारण्यात आले असून त्यातून 22. 50 लाख रुपये वार्षिक परवाना शुल्क मिळणार आहे.
अंधेरी स्थानकावरील सलूनच्या माध्यमातून रेल्वेला वर्षाला नऊ लाख रुपये परवाना शुल्क मिळणार आहे, तर चर्चगेट स्थानकावरील सलूनच्या माध्यमातून 22.50 लाख रुपये वार्षिक परवाना शुल्क मिळणार आहे.































































