साळवी स्पोर्टस् क्लब विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अविनाश साळवी स्पोर्टस् क्लबने अंतिम फेरीच्या लढतीत प्रो वर्ल्ड टॅलेंट अॅकॅडमीला पराभूत करीत एजिस फेडरल क्रिकेट स्पर्धेच्या (13 वर्षांखालील) जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली. हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले.

प्रथम फलंदाजी करताना अविनाश साळवी स्पोर्टस् क्लब संघाने कर्णधार अभिज्ञान पुंदू याच्या नाबाद 113 धावांच्या खेळीमुळे निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 166 धावांचे लक्ष्य उभारले. या आव्हानाचा पाठलाग करताना प्रो वर्ल्ड टॅलेंट अॅपॅडमी संघाचा डाव केवळ 80 धावांवरच आटोपला. हर्षवर्धन बोरमुख (21) आणि आर्यन पवार (13) यांचा अपवाद वगळता त्यांचे अन्य फलंदाज पार निष्प्रभ ठरले. लेगस्पिनर वेदांत गोरे याने केवळ 13 धावांत 5 तर आयुष भोईर याने 4 धावांमध्ये 2 बळी मिळविले.

अंतिम सामन्यात नाबाद शतकी खेळी आणि स्पर्धेत 230 धावा करणाऱया अभिज्ञान पुंदू याला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कारासह स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून वेदांत गोरेची (9 बळी) तर स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून आदित्य खडका यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून प्रो वर्ल्ड टॅलेंट अॅपॅडमीच्या तनिश शेट्टी (97 धावा आणि 6 बळी) याची निवड करण्यात आली.