‘समांतर-2’ने रचला इतिहास, मिळाले 56 लाख ह्यूज!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमएक्स प्लेयरवरील ‘समांतर-2’ या वेब सिरीजने इतिहास रचला आहे. अवघ्या 15 दिवसांतच या वेब सिरीजला तब्बल 56 लाख ह्युज मिळाले आहेत. स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडीत, नितीश भारद्वाज आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ही वेब सिरीज 1 जुलैला प्रदर्शित झाली होती. गतवर्षी आलेल्या समांतरलादेखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. ‘समांतर-2’ ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिली गेलेली पहिली मराठी वेब सीरिज ठरली आहे.

समांतर-2च्या यशाबद्दल अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, ‘‘समांतर-2’ला भरभरून यश मिळणार याबाबत आम्हाला खात्री होती. कारण यातील सर्वच गोष्टी अचूकपणे जुळून आल्या आहेत. दुसऱया भागाला जो प्रतिसाद मिळतो आहे त्याने मला खूप आनंद झाला आहे. मी माझ्या करियरमध्ये जे नवीन प्रयोग करत आहे त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभतोय, याचाही मला आनंद आहे. समांतर-2च्या या सर्व यशाचे श्रेय निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार तसेच दिग्दर्शक समीर विद्वांस यांचेदेखील आहे. त्यांनी सर्जनशीलतेच्या बाबतीत जे श्रम घेतले आणि चित्रीकरणाच्या बाबतीत जो दर्जा सांभाळला त्याला तोड नाही.’’ समांतर-2मध्ये सई ताम्हणकर सर्वांसाठी सरप्राईज पॅकेज ठरली. याबाबत निर्माते अर्जुन आणि कार्तिक म्हणाले, ‘‘आम्ही सईची सुंदरा व मीराच्या व्यक्तिरेखांसाठी निवड केली तेव्हा अनेक नावे आम्हाला सुचवली गेली होती. परंतु आम्ही सईच्या नावावर ठाम होतो. या व्यक्तिरेखेला केवळ तीच न्याय देऊ शकेल, असा आम्हाला ठाम विश्वास होता.’’